संदीप आचार्य, मुंबई

एचआयव्ही- एड्सच्या रुग्णांना समाजात अस्पृश्यतेची वागणूक मिळत असताना शासनाच्या जे.जे. रुग्णालयातील नेत्रचिकित्सा विभागात अशा रुग्णांच्या मोतिबिंदूच्या नियमित शस्त्रक्रिया केल्या जातात. वर्षांकाठी जवळपास ५६५ शस्त्रक्रिया येथे करण्यात येत असून अनेक रुग्णालयांनी अप्रत्यक्षपणे नाकारलेले रुग्ण येथे येत असल्याचे आरोग्य सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.

प्रामुख्याने मुंबई, ठाणे व पुण्यामधून एचआयव्हीचे रुग्ण मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी जे.जे. रुग्णालयात येत असून विद्यमान विभागप्रमुख डॉ. रागिणी पारेख या प्रामुख्याने एचआयव्ही रुग्णांच्या मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया करतात, असेही डॉ. लहाने म्हणाले. सामान्यपणे दर शनिवारी पाच एचआयव्हीग्रस्त रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जातात.

पालिको रुग्णालयातून कोणत्याही वैद्यकीय टिपण्णीशिवाय यापूर्वीही रुग्ण पाठविण्यात येत होते. २००८ साली याची कल्पना पत्राद्वारे आम्ही पालिकेच्या वैद्यकीय संचालकांच्या दिली होती. तथापि आजही असे रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयांमधून जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात येत असल्यामुळे अशा रुग्णांची गर्दी वाढून आगामी सहा महिन्यांपर्यंत त्यांना शस्त्रक्रियेसाठी थांबावे लागणार असल्यामुळे या प्रकरणी चौकशी करून पालिकेच्या रुग्णालयातच त्यांच्या शस्त्रक्रिया केल्या जाव्यात अशी विनंती आम्ही पालिका आयुक्त अजोय मेहता व अधिष्ठात्यांना करणार असल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितले.

एचआयव्हीची चाचणी करणे कायद्यानुसार बंधनकारक नसल्यामुळे रुग्णावर चाचणीची सक्ती करता येत नाही. तथापि रुग्णाच्या सुरक्षेसाठी व डॉक्टरांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून बहुतेक रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णाला एचआयव्हीची चाचणी करून घेण्यास सांगितले जाते. रुग्णाला एचआयव्ही असल्याचे आढळल्यास खासगी असो की पालिका रुग्णालय असो थेट जे.जे. रुग्णालयात रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पाठवले जाते.

आम्ही याबाबत जेव्हा रुग्णांकडे विचारणा करतो तेव्हा आम्हाला जे.जे.मध्ये उपचारासाठी जाण्याचा सल्ला कोणतीही कागदपत्रे न देता दिला जातो असे रुग्णांचे म्हणणे असल्याचे डॉ. रागिणी पारेख यांनी सांगितले. या साऱ्याची गंभीर दखल घेऊन घेऊनच संबंधित रुग्णालयांना पत्र पाठविण्यात येणार असल्याचे डॉ. लहाने म्हणाले.