नवी मुंबई महापालिकेच्या दहा दिवसावर येऊन ठेपलेल्या मतदानासाठी सर्व पक्षीय उमेदवारांसह एकूण ५६८ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून शनिवारी अधिकृत निवडणूक चिन्ह मिळाल्याने प्रचाराला रंग आला आहे.
नवी मुंबई पालिका निवडणुकीच्या मतदानाला आता केवळ दहा दिवस शिल्लक राहिले आहेत. सेना आणि भाजपमध्ये बंडखोरी झाली असून सेनेत तर नेत्यांवर थेट उमेदवारीसाठी पैसे मागितल्याचा आरोप केला गेला आहे. १११ प्रभागांपैकी कमीत कमी ३२ प्रभागांत बंडखोरी झालेली आहे. त्याचा फटका सेना भाजपच्या उमेदवारांना बसणार आहे. राष्ट्रवादीचा अस्ते कदम सुरू असून त्यांच्या पक्षात झालेली तुरळक बंडखोरी त्यांनी थंड केली आहे. नियोजनबद्ध शहरातील दोन हजार कोटीच्या अर्थसंकल्प असणाऱ्या या पालिकेच्या चाव्या आपल्याकडे राहाव्यात यासाठी राष्ट्रवादी १०७, काँग्रेस ९१, सेना ६८, भाजप ४३, आरपीआय १४, बसपा १४, शेकाप ३६, फॉरवार्ड ब्लॉक ३, भारीप, हिंदुस्तान मानव आणि धर्मराज्य पक्षांचा प्रत्येकी एक असे सर्वपक्षीय ३७९ व अपक्ष १८९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यातून १११ नगरसेवक होणार असून ५६ महिला राहणार आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संयुक्त सभा घेणार असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण किल्ला लढविणार आहेत. राष्ट्रवादीने सर्व जबाबदारी गणेश नाईक यांच्यावर सोपविली आहे.