मुंबईत सोमवारी करोनाच्या १,२४७ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधितांचा आकडा ७६ हजारांच्या पुढे  गेला आहे. त्यातील ५७ टक्के  रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्याचबरोबर मुंबईत आतापर्यंत ४,४६१ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूदरही ५.८ टक्कय़ांवर गेला आहे.

मुंबईतील रुग्णवाढीचे प्रमाण कमी झालेले असले तरी सोमवारी देखील १,२४७ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण बाधितांचा आकडा ७६ हजार २९४ वर गेला आहे. तर, ७६३ संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. ८,१९० अति जोखमीचे संपर्क शोधण्यात आले आहेत.

सोमवारी ३९१ रुग्णांना घरी पाठवण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत ४३  हजार ५४५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. करोनामुक्त रुग्णांचा दर ५७ टक्कय़ांवर गेला आहे. २८ हजार २८८  रुग्ण उपचार घेत आहेत,  तर ९८७ रुग्ण गंभीर आहेत.

सोमवारी ४८ तासांत २१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर यापूर्वीच्या ७१ मृत्यूची नोंद समाविष्ट करण्यात आल्यामुळे एकूण ९२ मृतांची नोंद झाली आहे. यातील ४८ मृत हे ६० वर्षांवरील होते. त्यामुळे मृतांचा आकडा ४,४६१ वर गेला आहे. मृत्यूदर ५.८ वर गेला आहे. मृतांपैकी ३,५०४ रुग्ण हे ५० वर्षांवरील होते.

मुंबईतील करोनाचित्र

* एकूण बाधित : ७६,२९४

* एकूण करोनामुक्त : ४३,५४५ (५७ टक्के )

* सध्याचे सक्रीय रुग्ण : २८,२८८

* गंभीर स्थितीतील रुग्ण :  ९८७

* मृत : ४४६१ (५.८ टक्के )

ठाणे जिल्ह्यात दिवसभरात १,५६१ रुग्ण

जिल्ह्य़ात सोमवारी दिवसभरामध्ये १ हजार ५६१ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ातील करोनाबाधितांचा आकडा ३१ हजार ८५० इतका झाला आहे. सोमवारी जिल्ह्यात ३४ करोनारुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील एकुण मृत्यूंची संख्या १ हजार २० वर पोहचली आहे.

सोमवारी नोंद झालेल्या रुग्णांत कल्याण-डोंबिवली शहरातील ४६५, ठाणे शहरातील ३३८, नवी मुंबईतील २२७, भिवंडी शहरातील ११९, अंबरनाथ शहरातील ८८, उल्हासनगर शहरातील १३७, बदलापूर शहरातील २१, मीरा-भाईंदर शहरातील १२४ आणि ठाणे ग्रामीण भागातील ७२ रुग्णांचा समावेश आहे. सोमवारी जिल्ह्य़ात नोंदल्या गेलेल्या ३४ मृत्यूंमध्ये ठाण्यातील १५, कल्याण डोंबिवलीतील ६, मीरा भाईंदरमधील ३, ठाणे ग्रामीणमधील ३, भिवंडीतील २, अंबरनाथमधील २, नवी मुंबईतील २ आणि उल्हासनगरमधील एका करोनारुग्णाचा समावेश आहे.