27 May 2020

News Flash

मुंबईत ५७ नवे रुग्ण

रुग्णांचा आकडा २३८ वर; शहरातील २१२ परिसर प्रतिबंधित

करोनाचे रुग्ण वाढत असल्याने मुंबईत घरोघरी तपासणी सुरू आहे. (छाया-गणेश शिर्सेकर)

प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यास सुरुवात केल्यानंतरही मुंबईत गुरुवारी दिवसभरात ५७ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या २३८ वर गेली आहे. गुरुवारी दिवसभर विविध ठिकाणी एक रुग्ण सापडला, हा भाग प्रतिबंधित केला अशा घटना सतत ऐकायला येत असल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे  वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबईत वरळी कोळीवडय़ापाठोपाठ बुधवारी रात्री धारावी सारख्या सर्वात मोठय़ा दाटीवाटीच्या वस्तीत रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली होती. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पालिकेने अशा रुग्ण आढळलेले परिसर ताब्यात घेतले आहेत. गुरुवारी आणखी काही इमारती ताब्यात घेतल्यामुळे तब्बल २१२ परिसर प्रतिबंधित करण्यात आले आहेत. खाजगी प्रयोगशाळा मध्ये तपासणी सुरू करण्यात आल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर रुग्णांची संख्या पुढे येऊ लागली आहे.

वरळी कोळीवाडय़ात आज एकही नवीन रुग्ण आढळलेला नसला तरी जवळच असलेल्या आदर्श नगरमध्ये आणखी एक रुग्ण आढळून आला. तर वरळीतील जिजामाता नगरात राहणाऱ्या एका पालिका सफाई कर्मचाऱ्यालाही लागण झाल्याचे उघड झाले. हा कर्मचारी धारावी परिसरात कर्तव्यावर होता.  त्याच बरोबर वरळी पोलीस वसाहतीत एका हवालदारालाही करोना झाल्याचे आढळले आहे. त्याच्या संपूर्ण कुटुंबाला रुग्णालयात विलगीकरण करण्यात आले आहे. तर शीव कोळीवाडा परिसरात पंजाबी कॉलनीमध्ये  एक रुग्ण आढळल्यामुळे चार इमारती प्रतिबंधित केल्या. एका खाजगी रुग्णलयात काम करणाऱ्या आयामध्ये लक्षणे दिसल्यामुळे त्या राहत असलेल्या लालबाग मधील दोन इमारती प्रतिबंधित केल्या. दिवसभर सुरू असलेल्या अशा घटनांमुळे मुंबईकरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

तीन दिवसाचे बाळ आणि आई सुखरुप

चेंबूर येथे एका खाजगी रुग्णालयात नुकत्याच प्रसूत झालेल्या एका महिलेला व तिच्या तीन दिवसांच्या बाळाला करोना झाल्याचे आढळले होते. मात्र कस्तुरबा रुग्णालयातील चाचणीत या दोघांचेही अहवाल नकारार्थी आले आहेत. त्यामुळे खाजगी प्रयोगशाळांच्याच्या अहवालाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पालिकेने सध्या हे रुग्णालय बंद केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2020 12:49 am

Web Title: 57new corona patients in mumbai abn 97
Next Stories
1 ८६ टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत
2 वीजदरांवरून तज्ज्ञांचे टीकास्त्र, तर भाजप श्रेयासाठी सरसावला
3 अर्थसंकल्पात आरोग्य खात्याला दुय्यमच स्थान
Just Now!
X