मान्सूनपूर्वी बेस्ट उपक्रमाची परिवहन सेवा सज्ज असली तरी वीजपुरवठा करणारी यंत्रणेला मात्र ऐन पावसाळ्यात काहीशी अडचणी निर्माण होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बेस्ट उपक्रमातील एकूण सुमारे ४६६ तर वीजपुरवठा विभागातील एकूण ५८ कर्मचारी एकाच दिवशी सेवानिवृत्त झाल्याने बेस्टचे व्यवस्थापन काही प्रमाणात डळमळीत होण्याची शक्यता आहे. यात आधीच तुटवडा असणाऱ्या बेस्ट वीजपुरवठा विभागात आता काही कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाल्याने ऐन पावसाळ्यात बेस्ट ग्राहकांना ‘चटके’ बसण्याची शक्यता आहे.
सध्या बेस्ट उपक्रमात एकूण ४३ हजार ९७२ कर्मचारी आहेत. यात परिवहन विभागात २९ हजार ९७२ तर वीजपुरवठा विभागात १४ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. यातील एकूण ४६६ कर्मचारी मंगळवारी निवृत्त झाले. यातील ५८ कर्मचारी हे वीजपुरवठा विभागातील असल्याने ऐन पावसाळ्यात काही तांत्रिक अडचणी झाल्यास ग्राहकांची गैरसोय होणार असल्याचा आरोप बेस्ट समितीच्या सदस्यांनी केला आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी ४६६ कर्मचारी निवृत्त होत असतानाही बेस्ट प्रशासनाने पर्यायी व्यवस्था का केली नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
दरवर्षी मुंबईसह उपनगरात पावसाळ्याच्या तडाख्यात विजेच्या वायर दुरुस्तीची कामे उद्भवत असते. यात विद्युत पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना प्रचंड धावाधाव करावी लागली. मात्र यंदा मान्सूनपूर्वी बेस्ट वीज कर्मचाऱ्याची संख्या कमी झाल्याने वीज ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत ग्राहकांची गैरसोय होणार नाही, याची पूर्ण काळजी घेण्यात येईल, असे बेस्टकडून सांगण्यात आले.