20 September 2020

News Flash

राज्य संस्कृत नाटय़ स्पर्धा : रंगमंचाऐवजी सभागृह; मुंबई विभागीय स्पर्धेतील प्रकार

इतर वेळी हे सभागृह लग्न, प्रदर्शन किं वा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी दिले जाते.

राज्य संस्कृत नाटय़ स्पर्धा

नीलेश अडसूळ, लोकसत्ता

मुंबई : राज्य नाटय़ स्पर्धामधून उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ मिळत असले तरी रंगमंचासाठी ‘व्यासपीठ’ देताना आपण नेमकी कोणती जागा निवडत आहोत, याचा राज्य सरकारला विसर पडला आहे. ५९व्या संस्कृत नाटय़ स्पर्धेसाठी सरकारने नाटय़गृहाऐवजी मुलुंड येथील ‘महाराष्ट्र सेवा संघ’ या लग्न किंवा तत्सम कार्यक्रमांकरिता वापरल्या जाणाऱ्या सामान्य सभागृहाची निवड केली आहे.

नाटकासाठीच्या नेपथ्याची कुठलीही सोय नसलेल्या ‘महाराष्ट्र सेवा संघ’ या सभागृहात नाटकाचे सादरीकरण करायचे कसे, असा प्रश्न स्पर्धक संघांना पडला आहे.

दरवर्षी एकाच केंद्रावर घेतली जाणारी राज्य संस्कृत नाटय़ स्पर्धा यंदा चार केंद्रांवर घेण्यात येणार आहे. त्यामुळे स्पर्धकांमध्ये समाधान आहे. परंतु मुंबई केंद्रात नाटय़गृहाऐवजी साधारण सभागृहाची निवड करण्यात आल्याने स्पर्धक संघ नाराज आहेत.

नाटकासाठी लागणाऱ्या कोणत्याही सुविधा महाराष्ट्र सेवा संघ सभागृहात नाही. इतरवेळी नाटय़गृहात नेपथ्याचे साहित्य, मदतीला येणारे कामगार यामुळे स्पर्धकांचा बराच भार हलका होतो. परंतु इथे नाटय़गृहच नसल्याने नेपथ्याची ने-आण करण्यात स्पर्धकांची दमछाक होणार आहे. तर सभागृहात प्रकाश आणि ध्वनी (साऊंड प्रूफ) रचना नसल्याने नाटकातील संवाद आणि प्रकाशयोजनेवर याचे परिणाम होणार आहे. खुर्च्याची रचनाही स्थायी स्वरूपात नसल्याने प्रेक्षकांची ऊठबस, ये-जा यामुळे होणारे खुर्च्याचे आवाज नाटकात व्यत्यय आणतील, असे स्पर्धकांचे मत आहे.

इतर वेळी हे सभागृह लग्न, प्रदर्शन किं वा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी दिले जाते. त्यामुळे कलाकारांना रंगभूषा आणि कपडेपटासाठी शेजारच्या लहानशा कक्षांचा आधार घ्यावा लागणार आहे. शिवाय ‘महाराष्ट्र सेवा संघ’ स्वत: या स्पर्धेत स्पर्धक म्हणून सहभागी होत आहे. अशा वेळी त्यांच्याच सभागृहात स्पर्धा घेणे कितपत संयुक्तिक आहे, असा स्पर्धकांचा प्रश्न आहे. नाटकाला लागणाऱ्या कोणत्याही सुविधा नसताना सरकारने कोणत्या निकषांआधारे या सभागृहाची निवड केली, असा प्रश्न त्यांना पडला आहे.

नाटकाच्या सादरीकरणाकरिता केवळ चार भिंतीच उपलब्ध करून द्यायच्या होत्या तर त्या कुठेही देता आल्या असत्या. मुंबईत इतकी नाटय़गृहे आहेत तरीही नाटकासाठी सुयोग्य असा रंगमंच उपलब्ध करून दिला गेलेला नाही. पुण्यात भरत नाटय़ मंदिर, नाशिकमध्ये परशुराम साईखेडकर आणि नागपूरमध्ये सायंटिफिक नाटय़गृह अशा नाटकांच्या सादरीकरणाला सुयोग्य ठरतील अशा ठिकाणी स्पर्धा होणार आहे. मग मुंबईतच हा दुजाभाव का?     

– एक स्पर्धक

मुंबईत नाटय़गृह उपलब्ध नसल्याने महाराष्ट्र सेवा संघाच्या सभागृहाची निवड करण्यात आली. परंतु स्पर्धक कलाकारांची गैरसोय पाहता येत्या दोन दिवसांत दुसऱ्या नाटय़गृहाबाबत सकारात्मक विचार केला जाईल.

– बिभीषण चौरे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 12:45 am

Web Title: 58th maharashtra state sanskrit drama competition in mulund zws 70
Next Stories
1 mumbai Mega block : मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक
2 प्राध्यापकांच्या रिक्त जागा त्वरित भरा!
3 नवोदित अभिनेत्रींना वेश्याव्यवसायात ढकलणारी महिला अटकेत
Just Now!
X