करोनाबाधित आणि संशयित रुग्णांसाठी सेवा-सुविधा उभ्या करण्याबरोबरच बेघर, बेरोजगार उपाशीपोटी राहू नयेत यासाठी वितरित करण्यात आलेले अन्नपदार्थ आदींसाठी आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या तिजोरीतील तब्बल ५९८ कोटी रुपये खर्च झाले आहेत.

सभागृह, वैधानिक समित्यांच्या बैठकांविना आणि संबंधित समितीच्या मंजुरीविनाच हा खर्च करण्यात आल्याने भाजपसह विरोधी पक्ष प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत.

करोनाबाधित रुग्णांसाठी रुग्णालयांमधील सुविधांमध्ये वाढ करण्यात आली. औषधांचा साठा, आवश्यक ती उपकरणेही उपलब्ध करण्यात आली. त्याचबरोबर संशयित रुग्णांसाठी मुंबईत ३३८ ठिकाणी ‘करोना काळजी केंद्र १’ सुरू करण्यात आली. तर १७४ ठिकाणी ‘करोना काळजी केंद्र २’ सुरू करण्याचा मानस होता. त्यापैकी ६० केंद्रे कार्यान्वित करण्यात आली. महालक्ष्मी रेसकोर्स, वरळीचे एनएससीआय मैदान, गोरेगावचे नेस्को, सोमय्या मैदान आदी ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर रुग्णांसाठी केंद्रे उभी राहिली. काही ठिकाणी प्राणवायूची, तर काही ठिकाणी अतिदक्षता विभागासारखी व्यवस्थाही करण्यात आली. याशिवाय पालिकेने बेघर आणि बेरोजगार कामगारांना अन्नपदार्थ पाकिटांचा पुरवठा करण्यास सुरुवात केली. सुमारे साडेतीन लाख व्यक्तींना दुपारी आणि रात्री जेवणाचा पुरवठा पालिकेकडून करण्यात येत होता. नगरसेवकांच्या मतदारसंघातही अन्नपदार्थ पाकिटे वाटली जात होती. आता बहुसंख्य परप्रांतीय मुंबईतून निघून गेल्याने  नोंद असलेले बेघर, बेरोजगारांनाच अन्न पाकिटांचे वाटप होत आहे.

असा झाला खर्च..     (रुपये कोटींमध्ये)

अन्नपदार्थ पाकीट-    ७३.८६

मध्यवर्ती खरेदी खाते- ११९.४८

यांत्रिकी आणि विद्युत विभाग- ६.६०

कार्यकारी आरोग्य अधिकारी-६३.१

सेवन हिल्स, विभागवार जम्बो सुविधा-   २५६.७४

मोठी रुग्णालये-    ४०.२१

विशेष रुग्णालये-  ९.९१

संलग्न रुग्णालये-   २८.६३

वैद्यकीय महाविद्यालये-  ०.०९

एकूण-    ५९८.८३  कोटी रुपये