News Flash

मुंबईतील ताज हॉटेलला करोनाचा विळखा; सहा जण पॉझिटिव्ह

ज्या कर्मचाऱ्यांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे व ज्यांच्यात करोना सदृष्य लक्षणे आढळली आहेत, अशा सर्वांना तातडीने क्वारंटाइनमध्ये पाठवण्यात आले आहे

करोनामुळे मुंबईत २५ वर्षांच्या युवकासह १२ जणांचा शनिवारी मृत्यू झाला असून मृतांची संख्या ७६ वर पोहोचली आहे. तर करोनाची लागण झालेल्या १८९ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील करोनाबाधितांची संख्या ११८२ वर पोहोचली आहे. करोनाबाधितांचा आकडा हजाराच्या वर गेल्यामुळे मुंबईची चिंता वाढली आहे. क्षिण मुंबईतील प्रसिद्ध पंचतारांकित ताज महल पॅलेज हॉलेटमध्येही करोनाचा संसर्ग झाल आहे. येथील सहा कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये भितीचं वातावरण आहे. या सहा कर्मचाऱ्यांवर मुंबईतील रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे.

प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, ताज हॉटेलमधील सहा कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली असून त्यांच्यावर आवश्यक ते उपचार तातडीने सुरू करण्यात आले आहेत. सध्या त्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. मुंबई महापालिका आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ताज हॉटेलमधील काही कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतर कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

दरम्यान, ताज हॉटेलचं व्यवस्थापन सांभाळत असलेल्या द इंडियन हॉटेल्स कंपनीने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. ज्या कर्मचाऱ्यांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे व ज्यांच्यात करोना सदृष्य लक्षणे आढळली आहेत, अशा सर्वांना तातडीने क्वारंटाइनमध्ये पाठवण्यात आले आहे. सरकारच्या स्थानिक यंत्रणांच्या सर्व सूचना पाळल्या जात आहेत, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

मुंबईतील वरळी, भायखळा, गिरगाव, ग्रॅन्ट रोड, ताडदेव या परिसरातील करोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. आता करोनाग्रस्त परिसरांमध्ये वांद्रे-पूर्व आणि धारावीचाही समावेश झाला आहे. सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील रहिवाशांचे करोनापासून संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र कृती आराखडा आखण्यात आला आहे. तर वरळीमध्येही अतिधोकादायक परिसर निश्चित करण्यात आले आहेत.

मुंबईमधील रुग्णालयांमध्ये शनिवारी दिवसभरात २९३ करोना संशयित भरती झाले असून रुग्णालयात दाखल संशयितांची संख्या ४३२८ वर पोहोचली आहे. तर शनिवारी १८९ जणांना करोनाची बाधा झाल्याचे चाचणी अहवालावरून स्पष्ट झाले. मुंबईतील एकूण करोनाबाधितांची संख्या ११८२ वर पोहोचली आहे. वरळी येथे वास्तव्यास असलेल्या एका डॉक्टरला करोनाची बाधा झाली असून शुश्रूषा रुग्णालयात रुग्ण तपासणीच्या निमित्ताने हे डॉक्टर तेथे आले होते. त्यांच्या संपर्कात आलेले एक रुग्ण, दोन परिचारिका आणि डायलिसिससाठी आलेल्या एका व्यक्तीला करोनाची बाधा झाली. तर शुश्रूषा रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा त्यात समावेश असून त्यांच्या घरातील पाच जणांना करोनाची बाधा झाल्याचे शनिवारी उघडकीस आहे. के. ई. एम. रुग्णालयातील परिचारिकेलाही करोनाची लागण झाली असून त्यांना पुढील उपचारांसाठी सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे १५ चतुर्थश्रेणी कामगार आणि ७ परिचारिका यांना ५ दिवसांसाठी घरी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यापूर्वीही २ चतुर्थश्रेणी कामगारांना कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2020 10:04 am

Web Title: 6 employees of mumbais iconic taj mahal hotels test positive for coronavirus nck 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 नोकरीची संधी : मुंबई महापालिकेत ११४ वॉर्ड बॉयची भरती
2 मुंबईतील १७ वाहनतळांवर चाचण्यांसाठी नमुने संकलन
3 नागपाडा, नायगाव पोलीस रुग्णालयांच्या वेळेत कपात
Just Now!
X