कल्याणमध्ये काल रात्रीपासून चांगलाच पाऊस कोसळतो आहे. दरम्यान २६ आणि २७ जुलै रोजीही खूपच पाऊस झाला होता. त्यावेळी पुराच्या पाण्यात एक सहा महिन्यांची मुलगी अडकली होती. या मुलीला प्रशांत तरे या युवकाने टायर ट्युबच्या आणि त्याच्या मित्रांच्या  मदतीने वाचवले. या संदर्भातला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.  २६ आणि २७ जुलै या दोन्ही दिवशी प्रचंड पाऊस पडत होता. महालक्ष्मी एक्स्प्रेसही वांगणी या ठिकाणी अडकून पडली होती. हेलिकॉप्टरच्या मदतीने आणि NDRF च्या टीमने या सगळ्यांना वाचवले.

कल्याण, बदलापूर या ठिकाणीही अनेक भागांमध्ये पाणी साठले होते. अशात कल्याणमधल्या मोहने या ठिकाणी पुराचं पाणी साठलं होतं. एक सहा महिन्यांची मुलगी पुराच्या पाण्यात अडकल्याचे समजले तेव्हा प्रशांत तरे आणि त्याच्या मित्रांनी या लहान मुलीला वाचवण्यासाठी धाव घेतली आणि टायरच्या टयूबवर या मुलीला ठेवून तिचे प्राण वाचवले.

दरम्यान आजही मुंबईसह नाशिक आणि पुण्यामध्ये चांगलाच पाऊस कोसळतो आहे. पुण्यात पावसाचं पाणी भिडे पुलावर आलं होतं. तर नाशिकमध्ये गंगापूर धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.