खोटी माहिती देऊन एकापेक्षा जास्त परवाने असलेल्यांच्या विरोधात परिवहन विभागाने कारवाई करण्यास सुरूवात केली असून ठाण्यातील तिघा रिक्षा चालकांकडे प्रत्येकी दोन परवाने सापडले असून सहाही परवाने रद्द केले आहेत.
ठाण्यातील गोम्स, तिवारी आणि मौर्य या तिघांच्या नावे प्रत्येकी दोन परवाने असल्याचे आढळून आल्यावर त्यांच्याकडील एक परवाना रद्द करण्याची शिफारस मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे करण्यात आली होती. मात्र चुकीची माहिती देऊन अशा पद्धतीने १९९७ पासून दोन परवाने बाळगत असलेल्या या तिघांकडे असलेले हे सगळे परवाने रद्द करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतल्याचे परिवहन आयुक्त व्ही. एन. मोरे यांनी सांगितले.
१९९७ पासून नवे परवाने देणे बंद करण्यात आले असून ज्यांच्याकडे परवाने आहेत त्यांची संपूर्ण माहिती गोळा करण्यात येत आहे. येत्या चार महिन्यांमध्ये हे काम पूर्ण करण्यात येईल आणि सर्व माहिती परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर टाकण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.