बायोमास ऊर्जा खरेदीअंतर्गत १२ वर्षांत वीज नाहीच, गुंतवणुकीवरही पाणी; ऊर्जापुरवठा करणाऱ्या कंपनीवर १०२ कोटींचा दावा

मुंबई : सेंद्रिय साहित्यापासून विकसित होणाऱ्या ‘बायोमास’ ऊर्जा खरेदीत बेस्ट उपक्रमाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. या ऊर्जेची निर्मिती करून त्याचा पुरवठा करणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी बेस्ट उपक्रमाने १२ वर्षांपूर्वी ६० कोटी रुपयांची गुंतवणूक के ली होती. परंतु हे काम हाती घेणाऱ्या कं पनीने ना ऊर्जानिर्मिती केली ना ‘बेस्ट’ला ऊर्जेचा पुरवठा. परिणामी गुंतवणूक केलेली रक्कम बुडाल्याने उपक्रमाने या कंपनीविरोधात न्यायालयात १०२ कोटी रुपयांचा दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑगस्ट २००८ मध्ये बेस्ट उपक्रमाने बायोमास ऊर्जा खरेदी करण्याकरिता एका कंपनीशी गुंतवणूक करार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी या प्रस्तावाला बेस्ट समितीने मंजुरी दिली होती. बेस्ट उपक्र माच्या ऊर्जा खरेदीची पूर्तता करण्याकरिता प्रतियुनिट पाच रुपये दराने बायोमास ऊर्जा खरेदी करण्याचे निश्चित झाले. या गुंतवणूक करारानुसार अहमदनगर आणि सातारा या ठिकाणी २५ मेगावॅट क्षमतेचा बायोमास ऊर्जा प्रकल्प प्रस्थापित के ला जाणार होता. त्यासाठी उपक्र माने एकू ण ६० कोटी रुपये रक्कम कं पनीकडे ठेव म्हणून ठेवली. अटी व शर्तीसह २००९ साली बेस्ट उपक्र म आणि कं पनी यांच्या दरम्यान ऊर्जा खरेदी करारही झाला.

कंपनीने ऊर्जा खरेदीच्या करारानुसार २४ महिन्यांच्या आत अटींची पूर्तता करणे गरजेचे होते. मात्र कंपनीने गुंतवणूक कराराच्या तारखेपासून प्रकल्प सुरू करण्यास विलंब के ला. कंपनीने प्रकल्प उशिरा सुरू करतानाच विद्युतपुरवठाही के ला नाही आणि अन्य अटींची पूर्तताही केली नाही. त्यामुळे या कंपनीसोबत असलेला विद्युत करार संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बेस्ट समितीच्या बैठकीतही प्रस्ताव ठेवला जाणार आहे.

बायोमास ऊर्जा म्हणजे काय?

बायोमास हे एक महत्त्वाचे नैसर्गिक ऊर्जास्रोत आहे. बायोमास एक इंधन असून ते सेंद्रिय घटकांच्या मदतीने विकसित केले जाते. विद्युतनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेचा हा नूतनीकरणयोग्य आणि टिकाऊ स्रोत आहे. बायोमास एकतर थेट वापरला जाऊ शकतो किंवा जैविक इंधनासारख्या ऊर्जेच्या इतर रूपात रूपांतरित केला जाऊ शकतो.

बेस्ट उपक्रमाने बायोमास प्रकल्पाचा करार करताना योग्य ती दक्षता घेणे आवश्यक होते. कं पनीला विद्युतनिर्मितीचा अनुभव आहे का, त्यात कोणी तज्ज्ञ व्यक्ती आहेत का, शिवाय प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरच काही रक्कम देणे इत्यादी मुद्दे लक्षात घेतले पाहिजे होते. त्याकडे दुर्लक्ष के ल्याने आर्थिक फटका बसला आहे.

सुनील गणाचार्य, बेस्ट समिती सदस्य (भाजप)