News Flash

६० टक्के तालुक्यांतील भूजलपातळीत घट

७२ तालुक्यांतील एकूण २,१३० गावांमध्ये गेल्या वर्षी २० टक्क्यांपर्यंत कमी पावसाची नोंद झाली होती.

| May 2, 2017 02:47 am

राज्यातील ३५३ तालुक्यांपैकी २१८ तालुक्यांतील भूजलपातळी किमान एक मीटरने खालावली आहे

५,१६६ गावांत पाणीटंचाईचे संकेत; शासकीय सर्वेक्षणातून बिकट जलस्थिती उघड, सरकारपुढे पाणीपुरवठय़ाचे आव्हान

राज्यातील जलसाठय़ांतील पाणी झपाटय़ाने घटू लागले असताना भविष्यातील जलस्थिती बिकट असेल, याचे संकेत मिळू लागले आहेत. राज्यातील जवळपास ६० टक्के तालुक्यांतील भूजलपातळी किमान एक मीटरने खालावल्याचे शासकीय सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. यामुळे दुष्काळदाह आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

‘‘राज्यातील ३५३ तालुक्यांपैकी २१८ तालुक्यांतील भूजलपातळी किमान एक मीटरने खालावली आहे. यामुळे या तालुक्यांतील सुमारे ५,१६६ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे’’ असे भूजल सर्वेक्षण व विकास संस्थेच्या (जीएसडीए) अहवालात म्हटले आहे. राज्यातील ३,९२० विहिरींतील जलस्थितीचा आढावा घेऊन हा अहवाल तयार करण्यात आला आहे. ‘जीएसडीए’ने मार्च महिन्यात भूजलस्थितीची पाहणी केली होती. पाणीटंचाई दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याकिरता हा अहवाल महत्त्वाचा मानला जातो.

७२ तालुक्यांतील एकूण २,१३० गावांमध्ये गेल्या वर्षी २० टक्क्यांपर्यंत कमी पावसाची नोंद झाली होती. या गावांत भूजलपातळीत एक मीटरपेक्षा अधिक घट नोंदविण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच ११३ तालुक्यांतील १,८५४ गावांमध्ये गेल्या वर्षी चांगला पाऊस पडला होता. या गावांतही भूजलपातळीत किमान एक मीटरने घट नोंदविण्यात आली आहे.

राज्यातील ३२५ गावांमध्ये भूजलपातळीत मोठी घट नोंदविण्यात आली आहे. ही घट तीन मीटरहून अधिक असून, या गावांतील पाणीस्थिती बिकट आहे, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. ८५७ गावांमध्ये भूजलपातळी दोन ते तीन टक्क्यांनी घसरली आहे.गेल्या वर्षी ३०९ तालुक्यांत भूजलपातळीत किमान एक मीटरने घट नोंदविण्यात आली होती.

औरंगाबादच्या जल व भूव्यवस्थापन संस्थेचे माजी साहाय्यक प्राध्यापक (सिंचन व्यवस्थापन) प्रदीप पुरंदरे यांनी घटलेल्या भूजलपातळीसाठी दोन गोष्टी कारणीभूत असल्याचे सांगितले. ‘‘जास्त पाणी लागणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांचा अधिक कल आणि बाटलीबंद पाणीपुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी केलेला जलस्रोतांचा गैरवापर या जलपातळी घटण्यामागील दोन शक्यता आहेत,’’ असे पुरंदरे यांनी सांगितले. पुरंदरे हे राज्याच्या एकात्मिक राज्य जलनियोजन समितीचे सदस्य आहेत.

शेतकरी अधिक उत्पन्नासाठी जास्त पाणी लागणारी पिके घेतात. त्याचा ताण भूजलपातळीवर पडतो. तर शहरी किंवा निमशहरी भागांत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे क्षेत्र मोठय़ा प्रमाणावर भूजलावर अवलंबून आहे.

अशा कंपन्यांवर कोणत्याही नियामक संस्थेचे नियंत्रण नाही. त्यामुळे त्यांच्याकडून मोठय़ा प्रमाणावर जलउपसा होणे ही चिंतेची बाब आहे, असे पुरंदरे यांनी सांगितले.

७२ तालुक्यांतील २,१३० गावांमध्ये भूजलपातळीत एक मीटरपेक्षा अधिक घट नोंदविण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच ११३ तालुक्यांतील १,८५४ गावांतही भूजलपातळीत किमान एक मीटरने घट नोंदविण्यात आली आहे.

राज्यातील ३२५ गावांमध्ये भूजलपातळीत मोठी घट नोंदविण्यात आली आहे. ही घट तीन मीटरहून अधिक असून, या गावांतील पाणीस्थिती बिकट आहे, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 2:47 am

Web Title: 60 percent ground water levels dipping in maharashtra talukas
Next Stories
1 रिपब्लिकन गटबाजीला समाजही जबाबदार
2 ‘आयआयटी मुंबई’मध्ये परीक्षेत गैरप्रकार?
3 विकासकाच्या घशात घातलेला माझगावमधील भूखंड सरकारीच
Just Now!
X