21 September 2020

News Flash

आत्मसमर्पण केलेले ६० नक्षलवादी एसटीत वाहक

एसटी महामंडळाने आत्मसमर्पण केलेल्या ६० नक्षलवादी तरुणांना वाहक म्हणून नोकरी दिली आहे. दीड महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर ते एसटीत रुजू होतील, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

नक्षलवादी आणि जवानांमध्ये गोळीबार किंवा धुमश्चक्री झाल्याच्या बातम्या आपण वाचतो. त्यातून नक्षलींविरोधात सार्वत्रिक संताप अनेकदा व्यक्तही होतो. मात्र, संधी आणि सहानुभूती मिळाल्यास हेच नक्षलवादी मुख्य प्रवाहात येऊन सरळमार्गी बनू शकतात. याबाबत आदर्श उदाहरण एसटी महामंडळाने घालून दिले आहे. यामुळे आता पूर्वाश्रमीचे नक्षलवादी एसटीतील प्रवाशांशी संवाद साधून त्यांचे तिकीट काढताना दिसतील. एसटी महामंडळाने आत्मसमर्पण केलेल्या ६० नक्षलवादी तरुणांना वाहक म्हणून नोकरी दिली आहे. दीड महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर ते एसटीत रुजू होतील, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली. याबाबतची प्रक्रिया सुरू झाली असून या तरुणांना वाहकाचा बिल्लाही देण्यात आला आहे.

एसटी महामंडळाने आपला चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन बसगाडय़ा आणल्या जात असतानाच आता महामंडळाकडून कर्मचाऱ्यांच्या गणवेशातही बदल करण्यात आला. त्यानुसार चालक, वाहकांबरोबरच तांत्रिक विभागातील कर्मचारी, सुरक्षारक्षक इत्यादींसाठी नवीन गणवेश देण्यात आला. आता नक्षलवादी तरुणांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी एसटीकडून नवीन योजना राबविली जात आहे. नक्षलग्रस्त तरुणांच्या पुनर्वसनासाठीही बिरसा मुंडा पुनर्वसन प्रकल्प योजना राबविण्याचा निर्णय परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष दिवाकर रावते यांनी घेतला होता आणि जानेवारी महिन्यात या योजनेची घोषणाही केली होती. आता या घोषणेची अंमलबजावणी केली जात आहे. गडचिरोली जिल्ह्य़ातील ६० नक्षलवादी तरुणांना एसटी महामंडळाकडून नोकरीत सामावून घेण्यात येत आहे. यात महिलांचा समावेश आहे.  दीड महिना प्रशिक्षण झाल्यानंतर ते सेवेत येतील, असे एसटीतील एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यांना वाहकपदाचा बिल्लाही देण्यात आला आहे. प्रशिक्षण पूर्ण होताच प्रथम त्यांच्या सोईनुसार पोस्टिंग देण्यात येईल. सुरुवातीला लांब पल्ल्याच्या मार्गावर वाहकपदाची जबाबदारी न देता मध्यम किंवा लहान पल्ल्याच्या मार्गावरच त्यांना काम दिले जाणार आहे.

आत्मसमर्पण केलेल्या आणखी काहींना संधी

  • ६० जणांची भरती प्रक्रिया पूर्ण करत असतानाच आणखी काही आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादींनीही एसटीतील वाहक पदाच्या नोकरीसाठी विचारणा केली आहे. महामंडळाकडून याबाबत लवकरच निर्णय जाहीर होईल, अशी माहिती देण्यात आली.
  • तिकीट काढण्याची प्रक्रिया काय, प्रवाशांशी संवाद कसा साधावा, आगारात पैसे कसे जमा करावे इत्यादीचे प्रशिक्षण त्यांना देण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्य़ात नक्षलग्रस्त भागात रस्त्याच्या बाजूला २६ मार्गस्थ निवारेही बांधण्याची प्रक्रिया एसटी महामंडळाकडमून सुरू करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2018 5:02 am

Web Title: 60 surrendered naxal now become st bus driver
Next Stories
1 सदाभाऊ म्हणतात, मी तर भाजपाचा क्रियाशील सदस्य
2 वारकऱ्यांच्या नियुक्तीने राजकीय हित साधले! 
3 गिरीश महाजन यांच्या भूमिकेमुळे भाजपमध्ये संभ्रम
Just Now!
X