राज्यातील १९ मतदारसंघात २६ महिलांसह ३३८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ३.१७ कोटी मतदार २४ एप्रिल रोजी, गुरुवारी मतदानयंत्रात बंद करणार आहेत. या टप्यात बहुतांश ठिकाणी होत असलेल्या अटीतटीच्या लढतींमुळे संवेदनशील मतदान केंद्राच्या संख्येत कमालीची वाढ झाली असून ती १०७६ झाली आहे. रायगड, पालघर आणि भिवंडीत सर्वाधिक संवेदनशील मतदान केंद्रे जाहीर झाली असून तेथे लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे लावले जात असल्याचे उच्चपदस्थ निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबई, रायगड, ठाण्यासह नाशिक, औरंगाबाद, जालना, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील १९ मतदार संघांत गुरुवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, जलसंपदामंत्री सुनिल तटकरे, माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावीत यांच्या कन्या हीना गावीत, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे आदींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तिसऱ्या टप्प्यासाठीच्या प्रचारात नरेंद्र मोदी, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, गोपीनाथ मुंडे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आदींच्या सभांनी राजकारण तापले होते. मंगळवारी अखेरच्या दिवशीही पवार यांनी मुंबईत गुरूदास कामत यांच्यासाठी तर गोपीनाथ मुंडे यांनी पूनम महाजन यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या.
रायगड, भिवंडीची ‘आघाडी’
मुंबई, रायगड, ठाण्यात प्रचारादम्यान झालेल्या वादावादीच्या पाश्र्वभूमीवर संवेदनशील मतदार संघामंध्ये वाढ झाली आहे. यात रायगडमध्ये सर्वाधिक १४४, भिवंडीत १३० तर वायव्य मुंबईत ८४ आणि दक्षिण मध्य मुंबईत ६५  मतदान केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. तेथे ८५१ मायक्रो ऑब्झर्वर नियुक्त असून पालघरमध्ये १११, भिंवडीतील १३०, ठाणे भागांतील ९१, कल्याणमधील ८६; अशा ६२० संवेदनशील मतदान केंद्रांवर कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.