आतापर्यंत ६०० तक्रोरी; पोलीस, शासकीय यंत्रणांची दमछाक

मुंबई : टाळेबंदी ऐन भरात असताना वांद्रे स्थानकावरून परप्रांतात रेल्वे गाडय़ा सुटणार आहेत.. मालाडच्या पठाणवाडीत १६७ करोनाबाधित आढळले.. एसटीतील अमुक हे कर्मचारी बाधित.. गेले काही दिवस व्हॉट्सअ‍ॅपपासून फेसबुकपर्यंतच्या अनेक समाजमाध्यमांवर फुटलेले अफवांचे पीक कापताना पोलिसांच्या नाकीनऊ आले आहेत. मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, विकृत मेंदू अफवेला जन्म घालतो तर समाजमाध्यमांवरील केविलवाण्या स्पर्धेमुळे तिला पाय फुटतात.

पोलिसांनी जनजागृतीसोबत धडक कारवाई करूनही करोनाशी संबंधित या अफवा थंडावलेल्या नाहीत. प्रत्येक अफवेनंतरची परिस्थिती हाताळताना पोलिसांसह शासकीय यंत्रणांची दमछाक होते. मालाडच्या पठाणवाडीत मंगळवारी आरोग्यशिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी तेथे उपस्थित रुग्णवाहिका, पीपीई किट घातलेल्या आरोग्य सेवकांच्या गर्दीचे छायाचित्र टिपून एकाच इमारतीत १६७ करोना रुग्ण आढळले, ही अफवा पसरवण्यात आली. अस्वस्थ झालेल्यांनी खातरजमेसाठी हे छायाचित्र, मजकूर आणखी पसरवले. पोलीस, पालिकेकडून अफवेचे खंडन होईपर्यंत ती सर्वदूर पसरली होती.

याच्या आदल्याच दिवशी, ‘मुंबईत आजपासून लागू होणार नियम’ या शीर्षकाखाली ११ मुद्दे समाजमाध्यमांवरून फिरवण्यात आले. त्यात चुकीच्या हेल्पलाइन क्रमांकासह खोटी माहिती देण्यात आली होती. मात्र त्यामुळे संभ्रम निर्माण झाला. अखेर पोलिसांनी हे पत्रक खोटे आहे, असे जाहीर केले आणि वातावरण निवळले.

राज्याच्या सायबर विभागाने वेळोवेळी करोनाबाबत अफवा पसरवू नका, असे आवाहन नागरिकांना केले. अफवा थोपवण्यासाठी  व्हाट्सअ‍ॅप द्य् समूहाच्या प्रमुखांसाठीही नियमावली जारी केली. सोबत अफवा पसरवणाऱ्यांविरोधात गुन्हेही नोंद करण्यास सुरुवात केली आहे. सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सुमारे ६०० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अक्कलहुशारी, व्यवहारज्ञान नसल्याने..

एका व्यक्तीला किंवा समूहाला घाबरून सोडायचे आणि गंमत पाहायची या विकृतीतून बहुतांश अफवा जन्म घेतात. ऐकताना, वाचताना ‘ध चा मा’ होतो किंवा माहितीचा चुकीचा अर्थ लावून ती पुढे देण्यातूनही अफवा निर्माण होतात. अलीकडे प्रत्येकाचे अस्तित्व समाजमाध्यमांवर आहे. तिथे मीच योग्य, मलाच आधी माहिती मिळते, माझे स्रोत दांडगे हे पटवून देण्यासाठी केविलवाणी स्पर्धा रंगते आणि त्यातून जसेच्या तसे पुढे पाठवले जातात, असे निरीक्षण मानसोपचारतज्ञ डॉ. मनोज भाटवडेकर नोंदवतात. समाजमाध्यमांवरून फिरणारा बराचसा मजकूर, छायाचित्रे किंवा ध्वनिचित्रफिती पाहिल्याक्षणी चुकीच्या, खोटय़ा वाटतात. मात्र अक्कलहुशारी, व्यवहारज्ञान न वापरता निव्वळ स्पर्धेपायी घाईघाईने हे साहित्य पुढे पाठवण्याची मानसिकता अफवा निर्माण करणाऱ्यांना बळ देते. त्यामुळे प्रत्येकाने समाजमाध्यम जबाबदारीने, गंभीर्याने हाताळण्याची गरज आहे, असेही डॉ. भाटवडेकर  म्हणाले.

शासकीय यंत्रणा-अधिकाऱ्यांच्या नावे अफवा

मुंबईत लष्कर तैनात करणार, बाहेर भटकणाऱ्यांवर लष्कराला गोळीबार करण्याचे आदेश, मुंबईत ये-जा करणाऱ्यांना नवी मुंबईत बंदी, कोंबडीच्या मांसापासून करोना पसरतो या आणि अशा अनेक अफवा पोलीस, शासकीय यंत्रणा किंवा शासकीय अधिकाऱ्यांच्या नावे पसरवण्यात आल्या. शिवाय चुकीची उपचारपद्धती, लक्षणे आदी माहितीही मोठय़ा प्रमाणात पसरवण्यात आली.