28 October 2020

News Flash

कृष्णा पिकॉक, कॉमन जेझबेल की ऑरेंज ओक्लिफ?

राष्ट्रीय फुलपाखरू ठरवण्यासाठी फुलपाखरुप्रेमींच्या उपक्रमास ६० हजार जणांचा प्रतिसाद

राष्ट्रीय फुलपाखरू ठरवण्यासाठी फुलपाखरुप्रेमींच्या उपक्रमास ६० हजार जणांचा प्रतिसाद

मुंबई : फुलपाखरू अभ्यासक, फुलपाखरुप्रेमींनी एकत्र येऊन देशाचे फुलपाखरू ठरविण्यासाठी घेतलेल्या निवड प्रक्रियेस देशभरातील तब्बल ६० हजार जणांनी प्रतिसाद दिला आहे. सात निवडक फुलपाखरांमधून कृष्णा पिकॉक, कॉमन जेझबेल (हळदीकुंकू) आणि ऑरेंज ओक्लिफ (ताम्रपर्ण) या तीन फुलपाखरांना सर्वाधिक प्रतिसाद लाभला असून, त्या संदर्भातील प्रस्ताव केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयास लवकरच पाठवण्यात येईल.

फुलपाखरू अभ्यासक, फुलपाखरुप्रेमी यांनी एकत्र येऊन देशाचे फुलपाखरू ठरविण्यासाठीची मोहीम ११ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर घेण्यात आली. देशासाठी राष्ट्रीय प्राणी, पक्षी, झाड अशी प्रतीके आहेत. मात्र राष्ट्रीय फुलपाखरू नाही. त्यामुळेच देशभरातील सुमारे ५० फुलपाखरुतज्ज्ञांनी एकत्र येऊन ही मोहीम हाती घेतली.

या मोहिमेअंतर्गत देशभरातील फुलपाखरुप्रेमी, अभ्यासकांकडून सात निवडक फुलपाखरांबाबत ऑनलाइन माध्यमातून प्रतिसाद मागविण्यात आला. त्यास तब्बल ६० हजार फुलपाखरुप्रेमींनी प्रतिसाद दिला. कृष्णा पिकॉक, कॉमन जेझबेल (हळदीकुंकू) आणि ऑरेंज ओक्लिफ (ताम्रपर्ण) या तीन फुलपाखरांना सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. या तीन फुलपाखरांची नावे आणि इतर सर्व प्रतिसाद केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयास पाठविला जाईल, असे या मोहिमेतील एक समन्वयक दिवाकर ठोंबरे यांनी सांगितले.

ही मोहीम स्वयंसेवी पद्धतीने घेण्यात आली होती. त्यास सर्वाधिक म्हणजे १८ हजार ७०० जणांचा महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळाला. त्याखालोखाल छत्तीसगड, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांतून प्रतिसाद मिळाला. यामध्ये १५ ते ३० वयोगटातील फुलपाखरुप्रेमींचा सर्वाधिक आहे.

संवर्धनास पाठबळ

जैवविविधतेसंबंधीची प्रतीके ठरविण्याचे काम केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाद्वारा केले जाते. देशात फुलपाखरांच्या १३२० प्रजाती आहेत. मात्र राष्ट्रीय फुलपाखरू आपल्याकडे घोषित केलेले नाही. आशियाई देशांपैकी मलेशिया, इंडोनेशिया, भूतान अशा काही देशांनी त्यांचे राष्ट्रीय फुलपाखरू पूर्वीच घोषित केले आहे. राष्ट्रीय प्रतीकांत फुलपाखराचा समावेश झाल्यास एकूण या काहीशा दुर्लक्षित विषयाकडे लक्ष वेधले जाऊन, त्यांच्या संवर्धनासही पाठबळ लाभेल, अशी अपेक्षा फुलपाखरू अभ्यासकांना वाटते. त्यातूनच ही मोहीम हाती घेण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 1:40 am

Web Title: 60000 people respond to decide the national butterfly zws 70
Next Stories
1 करोनाकाळात रक्ताचा मोठा तुटवडा
2 बॉलिवुडमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका
3 शेतकऱ्याला साडेनऊ लाखांचा ऑनलाइन गंडा
Just Now!
X