मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडेच ४९ प्रतिभावंतांनी पत्र लिहून देशातील वाढत्या झुंडबळींच्या घटना रोखण्याची मागणी करीत निषेध व्यक्त केला होता. या पत्राला आता ६१ नामवंतांनी खुल्या पत्राद्वारे उत्तर दिले असून केवळ मोजक्या प्रकरणांचा निषेध आणि विरोध करण्यात येत असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आल्याने नवा वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या नामवंतांनी लिहिलेल्या पत्राचे शीर्षक ‘अगेन्स्ट सिलेक्टिव्ह आऊटरेज अ‍ॅण्ड फॉल्स नॅरेटिव्हज’ असे आहे. पत्र लिहिणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये अभिनेत्री कंगना राणावत, गीतकार प्रसून जोशी, नृत्यांगना आणि खासदार सोनल मानसिंग. पं. विश्वमोहन भट, दिग्दर्शक मधुर भांडारकर आणि विवेक अग्निहोत्री आदींचा समावेश आहे.

यापूर्वी ४९ प्रतिभावंतांनी मोदी यांना पत्र लिहून देशातील अल्पसंख्याक आणि दलितांविरोधातील झुंडबळीच्या घटना वाढत असल्याचे म्हटले होते. या घटना त्वरित थांबविण्यात याव्या, असेही मोदींना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले होते. या पत्रामध्ये मणिरत्नम, अनुराग कश्यप, श्याम बेनेगल, अपर्णा सेन, शुभा मुदगल यांनी चिंता व्यक्त केली होती.

पत्रात काय?

जेव्हा नक्षलवादी आदिवासींना लक्ष्य करतात तेव्हा हे लोक  शांत का राहतात, काश्मीरमध्ये फुटीरतावादी शाळा जाळण्याचे आदेश देतात तेव्हा हे लोक कोठे होते, असे सवाल पत्रातून विचारण्यात आले असून जेएनयूमध्ये करण्यात आलेल्या घोषणाबाजीवरूनही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.