स्वाइन फ्लूच्या विकाराने सध्या राज्यभर दहशत माजविली असून, राज्यात ऑगस्ट महिन्याअखेरीस स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या ६१ हजारांवर पोहोचली असून, मुंबईत ही संख्या पावणेतीन हजारांच्या आसपास आहे. मुंबईत ऑगस्ट महिन्यात दरदिवशी सरासरी २३ जणांना स्वाइन फ्लूची बाधा झाल्याची नोंद आहे. आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईसोबतच पुणे, नाशिक या भागांतही गेल्या आठवडय़ाभरात स्वाइन फ्लूचा प्रभाव वाढत आहे.
मलेरिया आणि डेंग्यूऐवजी यंदा पावसाळ्यात स्वाइन फ्लूने दहशत निर्माण केली. खासगी प्रयोगशाळांमधून स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या अप्रत्यक्ष वाढवली जात असल्याची शक्यता व्यक्त करून या अहवालांच्या काटेकोर तपासणीचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी नुकतेच दिले. मात्र ही शक्यता लक्षात घेऊनही ऑगस्टमधील स्वाइन फ्लूच्या रुग्णांची व मृत्यूंची संख्या या साथीचा प्रभाव दाखवण्यास पुरेशी आहे. ऑगस्टमध्ये तब्बल ७१५ रुग्णांची नोंद झाली असून जानेवारीपासूनच्या रुग्णांची संख्या २,७४४ वर गेली. राज्यातील स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या ६१ हजारांहून अधिक झाली आहे. राज्यातील मृत्यूंचा आकडाही ६०३ वर गेला आहे. त्यातच गेल्या आठवडय़ात मुंबई, नाशिक, पुणे या शहरी भागांत स्वाइन फ्लूच्या मृत्यूंची नोंद झाली. प्रतिकारक्षमता कमी असलेल्या रुग्णांमध्ये स्वाइन फ्लूमुळे गुंतागुंत होत असल्याचे दिसून येत आहे.
’ मुंबईतील स्वाइन फ्लूचे रुग्ण : २,७४४
’ ऑगस्टमधील रुग्ण : ७१५
’ राज्यात स्वाइन फ्लूचे बळी : ६०३
’ मुंबईतील बळी : ४४