संदीप आचार्य 
मुंबई: करोनाच्या लढाईत देशातील ही पहिली व्यवस्था ठरेल जिथे आम्ही थेट खाजगी रुग्ण व्यवस्थेतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून गंभीर रुग्णांसाठी तब्बल ६१२ आयसीयू बेडचे व्यवस्थापन करत आहोत. पंचतारांकित रुग्णालयातील व्यवस्थेपेक्षा पालिकेच्या माध्यामातून चालविण्यात येणारी ही जम्बो आयसीयू रुग्णव्यस्था उत्तम असेल असा विश्वास महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहेल यांनी व्यक्त केला.
मुंबईची करोना रुग्णसंख्या आज ९०,४६१ झाली आहे तर रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणाऱ्यांची संख्या २३,०३५ एवढी आहे. मुंबईत दररोज सुमारे तेराशे ते पंधराशे नवे रुग्ण सापडत असून मुंबईतील रुग्णांसाठी परिणामकारक जम्बो रुग्णोपचार व्यवस्था निर्माण करण्याचा चंग आयुक्त चहेल यांनी बांधला आहे.

“सुरुवातीला बीकेसी, महालक्ष्मी, दहिसर, गोरेगाव एनएससी येथे तात्पुरती रुग्णालये उभारताना डॉक्टर, परिचारिका व आवश्यक आरोग्य कर्मचारी मिळण्यात आलेल्या अडचणी लक्षात घेऊन आयुक्त चहेल यांनी खाजगी तज्ज्ञ डॉक्टरांच्याच माध्यमातून ६१२ अतिदक्षता विभागातील बेडचे नियोजन करण्याची संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी किमान पन्नास टक्के बेडसाठीची हमी पालिकेने दिली असून प्रतिबेड प्रतिदिवस उपचारासाठी या खासगी डॉक्टरांच्या ग्रुपला सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. या जम्बो आयसीयू उपचार केंद्र योजनेअंतर्गत बीकेसीत १२० आयसीयू बेड असून सध्या ८० रुग्ण उपचार घेत आहेत. तर दहिसर येथे १०० आयसीयू बेड, नेस्को येथे १२०, मुलुंड १२०, भायखळा येथे १०० आणि रेसकोर्स येथे १०० आयसीयू बेड खासगी डॉक्टरांच्या ग्रुपच्या माध्यमातून चालविण्यात येणार आहे”, आयुक्त चहेल यांनी सांगितले.

“गेले काही महिने महापालिकेच्या केईएम, शीव व नायर रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील डॉक्टरांना करोना रुग्णांवरील उपचाराचा मोठा ताण सहन करावा लागला आहे. त्यामुळे मुंबईतील कोणत्याही गंभीर रुग्णाला यापुढे सर्वप्रथम आमच्या जम्बो अतिदक्षता विभागात दाखल केले जाईल. यासाठीचे आदेश कालच जारी केले असून २४ वॉर्डातील नियंत्रण कक्षच्या माध्यमातून ही रुग्णभरती केली जाणार आहे. मुंबईत आमच्याकडे उपलब्ध असलेल्या एकूण बेडपैकी आठ हजार बेड आज रिकामे आहेत तर अतिदक्षता विभागातील २२१ बेडवर रुग्ण नाहीत. याचाच अर्थ करोना रुग्णांवरील आमचे उपचार प्रभावी होत असल्यानेच हे बेड रिकामे राहात आहेत”, असे आयुक्तांनी सांगितले.

अर्थात आम्ही कोणताही धोका पत्करण्यास तयार नसल्याने आगामी काळात दोन लाख करोना रुग्ण झाल्यास उपचारांसाठी सज्ज राहाण्याची तयारी आम्ही केली असून जम्बो रुग्णोपचार व्यवस्था हा त्याचाच एक भाग आहे. महालक्ष्मी, बीकेसी, गोरेगाव नेस्को, मुलुंड व दहिसर येथे म्हणजे मुंबईतील प्रत्येक भागात रुग्णांना तातडीने उपचार मिळावे यासाठी ही जम्बो व्यवस्था निर्माण करण्यात आली असून ‘आयसीयू’तील उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होणे हे एक आव्हान होते. यासाठी खाजगी तज्ज्ञ डॉक्टरांच्या गटालाच ही जबाबदारी स्वतंत्रपणे देण्यात आली असून देशात असा हा पहिलाच प्रयोग असेल असे आयुक्त इक्बाल सिंग चहेल यांनी सांगितले. मी खात्री देतो की ही अतिदक्षता विभागाची व्यवस्था मोठ्या हॉस्पिटलमधील व्यवस्थेपेक्षा जास्त परिणामकारक असेल, असेही आयुक्तांनी सांगितले.

गेले तीन महिने मुंबई महापालिकेच्या केईएम, नायर व शीव रुग्णालयांसह पालिकेच्या १८ प्रमुख उपनगरीय रुग्णालयात आमच्या डॉक्टरांनी दिवसरात्र करोना रुग्णांवर उपचार केले व करत आहेत. या डॉक्टरांना आता थोडा आराम या नव्या व्यवस्थेमुळे मिळणार आहे. यासाठी जम्बो व्यवस्थेतील अतीदक्षता विभागातील बेड सर्वप्रथम भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. जोपर्यंत हे बेड भरणार नाहीत तोपर्यंत पालिका रुग्णालयातील आयसीयू मध्ये रुग्ण पाठवू नका असे आदेश

मुंबईतील सर्व वॉर्डातील नियंत्रण कक्षना जारी करण्यात आले आहेत. यामुळे आमच्या प्रमुख रुग्णालयातील आयसीयू च्या किमान पन्नास टक्के बेड मोकळे राहून डॉक्टरांना पुरेशी विश्रांती मिळेल असे आयुक्त इक्बाल सिंग चहेल यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्याची गंभीर रुग्णांसाठी रात्री बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री दहा ते सव्वाबारा पर्यंत मुंबईतील करोना रुग्णोपचाराची सविस्तर माहिती घेतली. यात गंभीर रुग्णांवरील उपचार व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर प्रामुख्याने चर्चा झाली. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, आयुक्त इक्बाल सिंग चहेल, तसेच प्रमुख अधिकारी व टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. जलील परकार, डॉ. उदवाडीया यांच्यासह खासगी क्षेत्रातील २५ हून अधिक तज्ज्ञ डॉक्टर्स उपस्थित होते. जम्बो अतिदक्षता रुग्ण व्यवस्थेचा आढावा घेताना मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी नियमित उपचारांचा आढावा घेण्यास मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.