दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षकासह पाच जण अटकेत
मुख्यमंत्री कोटय़ातून सदनिका मिळवून देतो असे सांगून एकास ६२ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या पाच जणांना मेघवाडी पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्यांमध्ये दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोसले याचा समावेश आहे. खोटी कागदपत्रे बनवून त्यांनी फसवणूक केल्याचे उघड झाले असून भोसले यास निलंबित करून खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
अंधेरी येथे राहणारे शेट्टीयार इराणी (६०) यांचा मुलगा शारीरिक विकलांग आहे. रमेश उपाध्याय याची इराणींशी मैत्री होती. त्यातून उपाध्याय याने इराणींची गाठ संजय मेहता याच्याशी घालून दिली. तुमचा मुलगा विकलांग असल्याने  अंधेरी येथे त्याच्या नावे मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छाधिकार योजनेतून सदनिका मिळवून देतो असे आश्वासन मेहता याने इराणी यांना दिले. त्यानंतर इराणी यांची भेट उपनिरीक्षक भोसले यांच्याशी घडवली गेली. आपण दहशतवाद विरोधी पथकातून निवृत्त झालो असून आता मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत असतो, अशी बतावणी भोसले याने केली. इराणी यांचा विश्वास संपादन केल्यानंतर पहिला हप्ता म्हणून १० लाख रुपये मागून २८ जानेवारी रोजी घर मंजूर झाल्याबाबतचे पत्र मिळेल, असे सांगण्यात आले. नंतर बनावट कागदपत्रांच्या आधारे पत्र देऊन २५ लाख रुपये व पुन्हा १० लाख रुपये इराणी यांच्याकडून घेण्यात आले. नंतर इराणींकडून १७ लाखांचा डिमांड ड्राफ्ट घेतला गेला. पण घराचे ताबा पत्र मिळत नसल्याने इराणी याने जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी केली असता, त्यांना देण्यात आलेली कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. अखेर इराणी यांनी पोलिसांत जाऊन तक्रार नोंदवल्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी रमेश उपाध्याय, संजय मेहता, जगजितसिंग मिश्रा, अनिल पुरोहित यांच्यासह दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोसले याला अटक केली.