संजय बापट

रब्बी हंगामात फटका : साठेबाजीमुळे डाळी, तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता

राज्यात साडेचार वर्षांत जलसंधारण आणि कृषी क्षेत्रातील भरीव गुंतवणुकीमुळे गेल्या वर्षी पाऊस कमी होऊनही उत्पादकता वाढल्याचा दावा राज्य सरकार करत आहे. प्रत्यक्षात दुष्काळामुळे कापूस, ऊस आणि सोयाबीनचा अपवाद वगळता इतर पिकांच्या लागवड आणि उत्पादनात कमालीची घट झाली. पुरेशा पाण्याअभावी रब्बी हंगाम वाया गेल्याने तृणधान्य- कडधान्याच्या उत्पादनात ६३ टक्के तर तेलबियांच्या उत्पादनात ७० टक्यांनी घट झाली आहे. त्यामुळे सरकारने साठेबाजीवर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर तेल आणि डाळींच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी झालेल्या राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत कमी पाऊस होऊनही उत्पादकता ११५ लाख मेट्रिक टन झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. जलयुक्त शिवार तसेच जलसंधारणात केलेल्या भरीव गुंतवणुकीमुळे कृषी उत्पादकतेमध्ये वाढ झाल्याचा दावा सरकार करीत असताना दुष्काळामुळे बहुतांश पिकांच्या लागवड आणि उत्पादनात मात्र मोठी घट झाल्याची धक्कादायक बाब याच बैठकीत सादर झालेल्या अहवालातून समोर आली. राज्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ३०७.५८ लाख हेक्टर असून त्यापैकी २०८.३५ लाख हेक्टर सरासरी पेरणी क्षेत्र आहे. त्यातही खरीप पिकाखालील उसासह सरासरी क्षेत्र १४९.७४ लाख हेक्टर आहे. रब्बी पिकांची सरासरी ५६.९३ लाख हेक्टर क्षेत्रावर तर उन्हाळी पिकांची सरासरी १.६८ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी किंवा लागवड करण्यात येते. गेल्या वर्षी राज्यात ८८१.७ मिलीमीटर म्हणजेच सरासरीच्या ७३.६ टक्के पाऊस झाला होता. सन २०१८च्या खरीप हंगामात १५१.३ लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच मागील वर्षांच्या तुलनेत ०.०५ टक्क्यांनी जास्त पेरणी झाली होती. प्रामुख्याने उसाच्या लागवडीखालील क्षेत्रात २९ टक्क्यांनी वाढ झाली होती. उत्पादनाच्या बाबतीतही तांदूळ २८ टक्के, ऊस १० टक्के, कापूस १७ टक्के आणि तेलबियांच्या उत्पादनात १६ टक्क्यांची वाढ झाली. त्याचवेळी ज्वारीच्या उत्पादनात ५० टक्क्यांनी तर बाजरीच्या उत्पादनात ५३ टक्क्यांनी घट झाली आहे. नाचणीच्या उत्पादनात २० टक्क्यांनी तर खरीप मक्याच्या उत्पादनात २२ टक्क्यांनी आणि तुरीच्या उत्पादनात ४५ टक्क्यांनी घट झाली आहे. खरीप भुईमुगाचे उत्पादन ३३ टक्क्यांनी, तिळाचे उत्पादन ५८ टक्क्यांनी तर सूर्यफुलाच्या उत्पादनात ७४ टक्क्यांनी घट झाली आहे.

कमी पाऊस आणि पाण्याची टंचाई यामुळे रब्बी हंगाम तर पूर्णत: वाया गेला असून मागील वर्षांच्या तुलनेत तब्बल ५० टक्के कमी क्षेत्रावर पेरणी झाली. प्रामुख्याने तृणधान्य, कडधान्य आणि तेलबियांच्या लागवडीत मागील वर्षांच्या तुलनेत अनुक्रमे ५६,  ४० आणि ५८ टक्क्यांनी घट झाली आहे. साहजिकच याचा उत्पादनावर मोठा परिणाम होणार असून रब्बी तृणधान्याच्या उत्पादनात ६८ टक्के घट होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये रब्बी ज्वारीच्या उत्पादनात ७२ टक्के, गव्हाच्या उत्पादनात ६१ टक्के  तर मक्याच्या उत्पादनात ७५ टक्के घट होण्याची शक्यता आहे. हरबऱ्याच्या उत्पादनात ५२ टक्यांनी घट होण्याची शक्यता आहे.

करडई ८७ टक्के जवस ७० टक्के, तीळ ९२ टक्के, रब्बी सूर्यफूल २२ टक्के अशी तेलबियांच्या उत्पादनात ७० टक्यांनी घट होण्याची शक्यता आहे. सन २०१९च्या उन्हाळी हंगामामध्येही केवळ  ८७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून ती मागील वर्षांच्या (१.३३ लाख हेक्टर) तुलनेत ३५ टक्क्यांनी कमी झाली असून तृणधान्य उत्पादनात १८, कडधान्यात ३२ तर गळीतधान्य उत्पादनात ५९ टक्क्यांनी घट झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे.

दुष्काळ आणि कृषी उत्पादनातील घट याचा व्यापारी फायदा घेऊ शकतात. साठेबाजी वाढून त्याचा कडधान्य आणि तेलाच्या पुरवठय़ावर परिणाम होऊ शकतो. राज्य सरकारने वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर येत्या काळात अन्नधान्य आणि तेलाच्या किमती मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर जाऊ शकतात.

डॉ. जे. एफ. पाटील, कृषी अर्थतज्ज्ञ