उन्हाळ्याच्या सुट्टीत आंबे, फणस, कोकम, करवंदे असा कोकणचा मेवा खाण्यासाठी मुंबईहून कोकणातल्या आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वे दादर-सावंतवाडी या दरम्यान विशेष गाडी चालवणार आहे. उन्हाळी सुटीच्या दरम्यान या गाडीच्या ६४ फेऱ्या होणार आहेत. मात्र सध्या नियमित असलेल्या रत्नागिरी-दादर या गाडीचा प्रवास आठवडय़ातील पाच दिवस दिवा स्थानकात थांबवून दादर-रत्नागिरी पॅसेंजर दिवा स्थानकातूनच पुढे चालवली जात आहे. त्यामुळे ही ‘विशेष’ गाडी तरी दादपर्यंत आणणार का, हा प्रश्न प्रवाशांना भेडसावत आहे.
मध्य रेल्वेतर्फे दादर-सावंतवाडी या दरम्यान ०१०९५ डाऊन ही विशेष गाडी २७ मार्चपासून दर मंगळवार, शुक्रवार आणि रविवार सावंतवाडीकडे रवाना होईल. ही गाडी दादरहून सकाळी ७.५० वाजता सुटून सावंतवाडी येथे संध्याकाळी ७.२० वाजता पोहोचेल. ही गाडी ७ जूनपर्यंत चालवली जाईल, तर ०१०९६ अप सावंतवाडी-दादर ही विशेष गाडी २८ मार्च ते ८ जून या दरम्यान दर बुधवार, शनिवार आणि सोमवार या दिवशी दादरकडे रवाना होईल. ही गाडी सावंतवाडीहून सकाळी पाच वाजता सुटून दादरला संध्याकाळी ४.१० वाजता पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या स्थानकांवर थांबेल. या गाडीत एक वातानुकूलित खुर्चीयान, सात द्वितीय श्रेणी आसनव्यवस्था, दोन साधारण श्रेणी आसनव्यवस्था असे डबे असतील.
कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाने या गाडीचे स्वागत केले असले, तरी सध्या नियमित स्वरूपात असलेली रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडी मध्य रेल्वे दिवा येथे स्थगित करत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. ही गाडी आठवडय़ातील पाच दिवस दिवा येथेच स्थगित करून तेथून पुन्हा रत्नागिरीकडे वळवली जाते. परिणामी, दादर-ठाणे येथून प्रवास करणाऱ्यांना आपल्या सामानासह दिवा गाठावे लागते, तर दिवा येथे उतरण्यास भाग पडलेल्या प्रवाशांना उपनगरीय सेवेने दादपर्यंत यावे लागते. अशा परिस्थितीत मध्य रेल्वे ही विशेष गाडी कशी आणि कुठे चालवणार, असा प्रश्न प्रवासी संघाचे अध्यक्ष संतोष पवार यांनी उपस्थित केला आहे.