चांदिवली येथील मोक्याच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या आलिशान इमारतींआड येणारी तब्बल ६५ वृक्षांची कत्तल करण्याची परवानगी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने दिली आहे. यामुळे त्यामध्ये आंबा, नारळ आदी झाडांचा समावेश आहे. वृक्ष प्राधिकरणाच्या या निर्णयांमुळे ६५ झाडांची लवकरच कत्तल होणार असून विकासकाला टोलेजंग इमारती उभारण्यामधील अडसर दूर झाला आहे.
परवानगीशिवाय झाड तोडणे हा गुन्हा आहे. त्यामुळे बैठय़ा घरांवर अथवा इमारतीवर कलणारे झाड तोडण्यास रहिवाशी धजावत नाहीत. त्यासाठी पालिकेच्या कार्यालयात जाऊन संबंधितांना रितसर परवानगी घ्यावी लागते. कोणत्याही क्षणी घरावर कोसळणारे झाड तोडण्यासाठी रहिवाशांना महिनोंमहिने पालिकेकडून परवानगी मिळत नाही. परवानगी घेण्यासाठी रहिवाशांना पालिका कार्यालयात अनेक वेळे खेटे घालावे लागतात. तर दुसरीकडे विकासाआड येणाऱ्या मोठमोठय़ा वृक्षांची कत्तल करण्यास वृक्ष प्राधिकरणाकडून हिरवा कंदिल दाखविला जातो. चांदिवली येथील डिमार्ट परिसरात कल्पतरु बिल्डरमार्फत टोलेजंग इमारती उभारण्यात येणार आहेत. या इमारतींच्या आड ६५ वृक्ष येत असून त्यात आंबा, नारळ आदी झाडांचा समावेश आहे. हे वृक्ष तोडण्यास परवानगी मिळावी म्हणून कल्पतरु आणि श्रेयांस विकासकांनी पालिकेकडे अर्ज सादर केला होता. उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठय़ा तत्परतेने छाननी करुन वृक्ष तोडीबाबतचा प्रस्ताव तयार केला आणि तो वृक्ष प्राधिकरण समितीकडे सादर केला. वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत तात्काळ हा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे लवकरच आंबा, नारळ, चिकू, पेरु आदी विविध झाडांवर लवकरच कुऱ्हाड चालविण्यात येणार आहे. ६५ पैकी ४६ वृक्षांची कत्तल करण्यात येणार असून १९ वृक्षांचे पुनरेपण करण्यात येणार आहे. मात्र पुनरेपण केलेल्या वृक्षांचे पुढे काय होते हे पाहण्याची यंत्रणा पालिकेकडे नाही. त्यामुळे पुनरेपण करण्यात येणाऱ्या १९ वृक्षांचे भवितव्यही धोक्यातच आहे, अशी टिका काही सदस्यांकडून करण्यात आली.