राज्यातील १६ वैद्यकीय महाविद्यालये तसेच चार आयुर्वेद महाविद्यालयांचा दर्जा वाढविणे, जे.जे. रुग्णालयाच्या नियोजित सुपरस्पेशालिटी इमारतीसाठी ६५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणे तसेच वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागात महासंचालकांसह आठ उपसंचालक व एक नेत्र संचालकांचे पद निर्माण करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी आज जाहीर केले.

वैद्यकीय शिक्षणाच्या विविध प्रश्नांवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एक बैठक पार पडली. यामध्ये राज्यासाठी स्वतंत्र नेत्र संचालकांचे पद निर्माण करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून पहिले संचालक म्हणून जे.जे. रुग्णालयांचे अधिष्ठाते डॉ. तात्याराव लहाने यांच्या नियुक्तीची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. शासनाला प्रत्येक जिल्ह्य़ात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे असल्यामुळे वैद्यकीय शिक्षण संचालनालयात यापुढे महासंचालक, संचालक तसेच आठ उपसंचालकांच्या पदांची नव्याने निर्मिती करण्याची घोषणाही महाजन यांनी केली. टाटा कॅन्सर रुग्णालयाच्या धर्तीवर राज्यातील चार विभागांत कॅन्सर रुग्णालये सुरू करणे, दंत विभाग सुरू करणे तसेच ४८ अध्यापकांची पदेही भरण्यात येणार आहेत. वैद्यकीय महाविद्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुरू करून वैद्यकीय शिक्षणातील देवाणघेवीला गती देण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षणाची गरज लक्षात घेऊन वित्त विभागाकडून सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन मुनगंटीवार यांनी दिले.