मुंबई : गेल्या २४ तासांत मुंबईत ६५६ करोनाबाधित आढळले, तर दिवसभरात एक हजारांहून अधिक रुग्ण करोनामुक्त झाले. रविवारी सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

आतापर्यंत मुंबईतील दोन लाख ९८ हजार ८८९ जणांना करोनाची बाधा झाली, त्यापैकी दोन लाख ७९ हजार ६४३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. रविवारी एक हजार १४५ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले.

आतापर्यंत ११ हजार १८६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. विविध रुग्णालयांमध्ये सात हजार १८० रुग्ण उपचाराधीन आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर ९३ टक्क्य़ांवर, तर करोना वाढीचा दर ०.२१ टक्क्य़ांवर स्थिर आहे. रुग्ण दुपटीचा सरासरी काळ ३६६ दिवसांवर पोहोचला आहे. बाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत २४ लाख ९५ हजार ५६० चाचण्या करण्यात आल्या आहेत.

गेल्या २४ तासांमध्ये बाधितांच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या गटातील तीन हजार ३०५ संशयितांचा शोध घेण्यात पालिकेला यश आले. त्यापैकी ४०७ संशयितांना करोना काळजी केंद्र-१मध्ये दाखल केले आहे. उर्वरित संशयित रुग्णांना गृहविलगीकरणाची परवानगी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे जिल्ह्य़ात ४११ नवे रुग्ण

ठाणे जिल्ह्य़ात रविवारी ४११ करोना रुग्ण आढळले, तर आठ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण करोनाबाधितांची संख्या २ लाख ४७ हजार ११३ आणि मृतांची संख्या ६ हजार २८ इतकी झाली आहे. रविवारी ठाणे पालिका क्षेत्रात १३४, कल्याण डोंबिवलीत १२९, नवी मुंबई ७१, मिरा भाईंदर २७, अंबरनाथ १२, ठाणे ग्रामीण आठ, बदलापूर १२, उल्हासनगर १० आणि भिवंडीतील आठ रुग्णांचा सामावेश आहे. मृतांमध्ये ठाण्यातील तीन, कल्याण डोंबिवली दोन, उल्हासनगर, नवी मुंबई आणि मिरा भाईंदरमधील एका रुग्णाचा सामावेश आहे.