News Flash

तराफा अपघातातील मृतांची संख्या ६६

मृतदेह जेजे रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले असून ओळख पटावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई :तराफा अपघातात मृतांची संख्या शनिवारी ६६ वर पोहोचली. त्यापैकी १८ मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. ‘पी ३०५‘ तराफा( बार्ज) समुदात बुडाल्यानंतर नौदलाने बचावकार्य, बेपत्ता असलेल्यांसाठी शोधमोहिम सुरू केली. शनिवारी संध्याकाळपर्यंत नौदलाने ६६ मृतदेह शोधले. पोलीस प्रवक्ते चैतन्य एस. यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार संध्याकाळपर्यंत नौदलाने ६१ मृतदेह  मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यापैकी ४३ मृतदेहांची ओळख पटली. त्यातील ४१ मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. १८ मृतदेहांची ओळख पटू शकली नाही. हे मृतदेह जेजे रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले असून ओळख पटावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दोन ते तीन दिवस पाण्यात राहिल्याने मृतदेह कुजले आहेत. शरीरावरील खुणा, दागिने, कपडे आदींवरून ओळख न पटल्यास डीएनए जुळणी अखेरचा पर्याय असेल. त्यासाठी ओळख न पेटलेल्या मृतदेहांचे डीएनए नमुने जतन करण्यात आले आहेत, असे चैतन्य यांनी सांगितले.

कप्तान राकेश बल्लव बेपत्ता

या अपघातास जबाबदार धरत येलो गेट पोलिसांनी ताराफेवरील कप्तान राकेश बल्लव यांच्यावोरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला. मात्र नौदलाने आतापर्यंत केलेल्या बचावकार्य, शोधमोहिमेत ते सापडलेले नाहीत. पोलीस ठाण्याच्या नोंदीनुसार कप्तान बल्लव बेपत्ता आहेत.

वरप्रदावरून मदतीसाठी संपर्क नाही

नौदलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार चक्री वादळादरम्यान चार बोटी, जहाजांवरून मदतीसाठी संपर्क साधण्यात आला. त्यात वरप्रदा बोटीचा समावेश नव्हता. ‘पी ३०५‘ तराफेवरील अधिकारी, कामगारांना वाचविण्यासाठी बचावकार्य सुरू झाले तेव्हा वरप्रदावरील दोघांना वाचविण्यात आले. त्यांच्याकडील चौकशीनंतर वरप्रदा बोटीवरील ११ जण बेपत्ता असल्याची माहिती पुढे आली, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

पीडितांच्या नातलगांना मदत

तौक्ते चक्रीवादळामुळे तराफा बुडून झालेल्या दुर्घटनेतील पीडितांच्या नातेवाईंकांना प्रवासासाठी ओएनजीसीकडून मदत देण्यात येणार आहे. ‘पी ३०५’ तराफ्यावरील मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईंकांना मुंबईत येण्यासाठी आणि गावी परतण्यासाठी ओएनजीसी मदत करणार आहे. त्याचबरोबर मृतदेह घेऊन गावी जाण्याची व्यवस्था केली आहे. त्यासाठी ओएनजीसीने ०२२ २६२७४४१९, ०२२ २६२७४४२०, ०२२-२६२७४४२१ हे हेल्पलाईन क्रमांक सुरू केले आहेत.

नौदलाकडून शोधमोहीम सुरूच

मुंबई :    नौदलाकडून आयएनएस मकर या युद्धनौकेसह शोधमोहीम सुरू आहे. साईड स्कॅन सोनार या यंत्रणेच्या मदतीने नौदलाकडून बुडालेल्या जहाजांचा शोध सुरू आहे. नौदलाने ‘पी ३०५’ तराफा बुडालेल्या ठिकाणी शनिवारी शोध घेतला.

बॉम्बे हाय येथे ओएनजीसी या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीच्या तेल विहीरी आहेत. या विहिरींवरील काही कामांचे कंत्राट ओएनजीसीने अ‍ॅफकॉनला दिले होते. ओएनजीसीच्या ‘एलईडब्लूपीपी १ आणि २’ या तेल फलाटांचे काम अ‍ॅफकॉनला मिळाले होते.

अ‍ॅफकॉन, हलानी, ट्रीयून आणि न्युवाता यांचा समुह आहे. अ‍ॅफकॉन या समुहाचे नियंत्रण करतो. त्यांच्याकडून ओएनजीसीच्या तेल विहिरींवरील कार्य सुरू होते. अ‍ॅफकॉनकडून तेल विहिरींच्या फालाटांच्या डागडूजीचे कार्य करण्यात येत होते.

या कामासाठी अ‍ॅफकॉनच्या समूह कंपन्यांबरोबरच अन्य काही कंपन्यांची मदत घेण्यात आली होती. यामध्ये मॅथ्यू, एएआरकेवाय, ओडीसी यांच्यासह अन्य काही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

या कर्मचाऱ्यांच्या राहण्यासाठी अ‍ॅफकॉनने डुमॅस्ट या कंपनीकडून ‘पी ३०५’ तराफा भाडेतत्त्वावर घेतला होता. या तराफ्यावरील नाविक आणि खलाशी हे डुमॅस्ट कंपनीचे कर्मचारी होते. तर अन्य कंपन्यांचे कर्मचारीही या ठिकाणी कार्यरत होते. या सर्व कर्मचाऱ्यांच्या राहण्याची ‘पी ३०५’ तराफ्यावर व्यवस्था करण्यात आली होती.

कारवाई करा-शेलार

ओएनजीसीच्या अ‍ॅफकॉनच्या इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंत्राटदार कंपनीने केलेल्या हव्यासापोटी सुमारे ८० जणांचे जीव धोक्यात घालण्यात आले. हे या कंत्राटदार कंपनीच्या बेपर्वाईचे बळी असल्याने या कंपनी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी शनिवारी केली.

या दुर्घटनेप्रकरणी तराफ्याचे कप्तान राकेश बल्लव यांच्याविरुद्ध अपघातामधील कर्मचाऱ्यांच्या  मृत्यूस तसेच दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या दुर्घटनेला केवळ कॅप्टन जबाबदार नसून तराफ्याची कंत्राटदार कंपनी जबाबदार आहे. मात्र कंत्राटदार  कंपनीचे मालक शापूरजी पालनजी, संचालक प्रेम शिवम, अश्विानी कुमार आणि पै यांना वाचवण्यासाठी राज्य शासन आणि पोलीस का प्रयत्न करीत आहेत? असा सवाल भाजप नेते शेलार यांनी पत्रकार परिषदेत  केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2021 1:42 am

Web Title: 66 killed in raft accident akp 94
Next Stories
1 बुधवारी खग्रास चंद्रग्रहण
2 परमबीर यांना तूर्त अटक नको!
3 महिलेला २४ व्या आठवड्यात गर्भपातास परवानगी
Just Now!
X