अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मुंबईकरांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्ह्य़ांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यांत भ्रमणध्वनी, इंटरनेट आणि सामाजिक माध्यामांचा वापर करून सुमारे ६६६ मुंबईकरांची फसवणूक करण्याता आली असून त्यातील केवळ १४७ प्रकरणांचा शोध घेण्यात पोलील यंत्रणेला यश आले. शहराच्या वाढत्या गुन्हेगारीत सायबर गुन्ह्य़ांचीही भर पडल्याने मुंबई पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
गेल्या दहा वर्षांत दैनंदिन व्यवहार, कामकाज, शिक्षण आणि व्यवसाय आदी क्षेत्रांत इंटरनेट वापराचे प्रमाण वाढत आहे. यात भ्रमणध्वनीचा वापर सर्वाधिक आहे. याचाच आधार घेऊन सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करत असल्याचे प्रकार वाढत आहेत. गेल्या दहा महिन्यांत बँकेच्या क्रेडिट कार्ड फसवणुकींची २२८ प्रकरणे घडली आहेत. तर बदनामी संदेश पाठवणे, अश्लील चित्रफिती (एमएमएस) बनवणे, संकेतस्थळे आणि ई-मेल हॅक करणे, सामाजिक माध्यमांवर बदनामीकारक छायाचित्रे टाकणे, पासवर्ड चोरणे आदी प्रकारातील गुन्ह्य़ांत एकूण ४३८ प्रकरणे नोंदवण्यात आली, तर दुसरीकडे अनेक सायबर गुन्ह्य़ांत नामांकित कंपन्या बदनामी होऊ नये यासाठी तक्रार नोंदवत नसल्याने आकडेवारी स्थिरावली असून या कंपन्यांनी तक्रार नोंदवल्यास आकडेवारी वाढण्याची शक्यता असल्याचे जाणकार सांगत आहेत.
गेल्या वर्षी ४१३ सायबर गुन्ह्य़ांची नोंद करण्यात आली होती. त्या वेळीही अश्लील संदेश आणि क्रेडिट कार्डद्वारे फसवणुकीची सर्वाधिक प्रकरणे नोंदवण्यात आली होती. सतत वाढत असलेल्या या गुन्ह्य़ांना पायबंद बसावा यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी जनजागृती अभियान राबवण्याचे आदेश दिले होते. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी २०० हून अधिक शाळा व महाविद्यालयांतील शिक्षकांना व विद्यार्थाना एकत्रित करून महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. यात ‘फोटो, पासवर्ड, भ्रमणध्वनी क्रमांक आणि कुटुंबाची माहिती आदी सामाजिक माध्यामांवर जाहीर करू नका’, ‘सामाजिक माध्यमांवर ओळख झालेल्या अनोळखी व्यक्तीला प्रत्यक्षात एकटे भेटू नका’, ‘आक्षेपार्ह, भडकाऊ संदेश आल्यास त्याला पसरवू नका’, ‘अश्लील चित्रफीत व चित्रे पाठवू नका’, ‘पायरेटेड चित्रपट, गाणी, गेम्स आणि व्हिडीओ डाऊनलोड करू नका’ आणि ‘पासवर्ड तयार करताना इंग्रजीतील लहान मोठी अक्षरे, चिन्हे व अंकांचा समावेश करा’ आदी सूचना देण्यात आल्याचे मुंबई पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

भ्रमणध्वनीचा वापर करून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे प्रमाण वाढत असून हे एक मोठे आव्हान आहे. परंतु त्याला प्रतिबंध घालण्यासाठी मुंबई पोलीस शर्थीचे प्रयत्न करत आहेत. काही यंत्रणांची मदत घेतली जात असून नागरिकांमध्येही जनजागृती करून सायबर गुन्ह्य़ांना पायबंद बसवला जात आहे. गुरुवारी शेकडो विद्यार्थाना आणि शिक्षकांना सायबर गुन्हय़ांविषयी माहिती देऊन सूचना करण्यात आल्या.
धनजंय कुलकर्णी, मुंबई पोलीस प्रवक्ते आणि उपायुक्त