मुंबई : आपल्या पश्चात मुलाचे संगोपन कोण करणार या चिंतेतून गतिमंद मुलाची हत्या करून वृद्धाने आत्महत्या केल्याची घटना मुलुंड येथे घडली. मुलुंडच्या योगी हिल्स परिसरात शनिवारी रात्री हा प्रसंग घडला. दशरथ भट असे वृद्ध पित्याचे नाव आहे.

या प्रकरणी भट यांच्या विरोधात मृत्यू पश्चात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला. तर त्यांच्या आत्महत्येप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केल्याचे मुलुंड पोलिसांनी सांगितले.

दशरथ भट (६६), त्यांच्या पत्नी सुधा (६५), तीन मुली आणि जन्मापासून गतिमंद मुलगा योगेश (३७) मुलुंडच्या योगी हिल्स परिसरात वास्तव्यास होते. भट अभियंता होते. तिनही मुलींचा विवाह झाल्यानंतर ते पत्नी आणि मुलासोबत राहात होते. योगेश गतिमंद असल्याने त्याचे सर्व विधी अंथरुणातच असत. आतापर्यंत भट आणि सुधा यांनी त्याचे संगोपन, शुश्रूषा के ली. मात्र, आपल्यानंतर योगेशचे संगोपन कसे होईल? त्याची देखभाल कोण करेल? हे प्रश्न त्यांना करोना काळात सतावू लागले. शनिवारी रात्री त्यांनी सुधा यांना आइस्क्रीममधून झोपेची गोळी दिली. भट यांनी योगेशलाही या गोळ्या दिल्या. तो झोपल्यानंतर एका मोठय़ा भांडय़ात पाणी भरून योगेशचे तोंड बुडवले. योगेशचा मृत्यू झाल्याची खात्री होताच भट यांनी सुधा यांना उद्देशून चिठ्ठी लिहिली. त्यानंतर गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी सकाळी झोपेतून उठलेल्या सुधा यांना हा प्रकार लक्षात आला.