अतिकामामुळे आरोग्याच्या समस्या वाढल्याचा ‘मार्ड’च्या पाहणीतील निष्कर्ष

सध्याच्या स्पर्धात्मक युगात वाढलेल्या कामाच्या वेळा आणि अस्थिर दिनचर्येमुळे नागरिकांना मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे प्रश्न सतावत असताना त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टरही मानसिक ताणतणाव, चिंता, निद्रानाश, हताश भावना, दबाव अशा अनेक प्रश्नांनी ग्रस्त आहेत. मुंबईतील ६८ टक्के डॉक्टर १२ ते १८ तास काम करीत असून सतत तणावाखाली असल्याचे निदर्शनास आले आहेत.

महाराष्ट्र निवासी डॉक्टर असोसिएशनने (मार्ड) केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे. सरकारी आणि पालिका रुग्णालयाच्या डॉक्टरांवर कामाचा ताण अधिक असल्यामुळे त्यांना आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात. रुग्णांवर होणाऱ्या आजारांविषयी चर्चा करताना डॉक्टरांच्या आरोग्याच्या समस्या दुर्लक्षित राहिल्या असल्याचे ‘मार्ड’चे म्हणणे आहे.

‘मार्ड’ संस्थेने ८०० निवासी डॉक्टरांच्या सर्वेक्षणातील २०० डॉक्टर मुंबईतील केईएम, शीव, नायर, जे.जे. या चार रुग्णालयांतील आहेत. ८०० डॉक्टरांपैकी २० टक्के डॉक्टर दर दिवशी १८ तासांहून अधिक वेळ काम करीत असल्याचे पाहणीत आढळले. तर ६८ टक्के डॉक्टर हे १२ ते १८ तास दररोज काम करीत आहेत.

डॉक्टरांच्या कामाच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने डॉक्टरांनी एक आठवडय़ात ४८ तास काम करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला असतानाही सर्वेक्षणातून आलेल्या आकडेवाडीनुसार ५१ टक्के डॉक्टर ७५ ते १०० तास काम करतात आणि १०० तास काम करणारे डॉक्टर १४ टक्क्याहून जास्त आहे. तर ३० टक्के डॉक्टर हे ५० ते ७५ तास काम करीत असून फक्त ५ टक्के डॉक्टर ४८ तासांहून कमी वेळ काम करतात.

या सर्वेक्षणाबरोबरच मे महिन्यात याच ८०० डॉक्टरांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न मार्ड संस्थेकडून करण्यात आला होता. त्यातून आलेली उत्तरे ही धक्कादायक आहे. यापैकी ४२६ डॉक्टर अनियमित कामाच्या वेळा आणि तणावामुळे नेहमीच तणावाखाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर २०४ डॉक्टर अनपेक्षित घडलेल्या कुठल्याच गोष्टींवर निराश असतात. तर २१० डॉक्टरांवरील तणाव दिवसेंदिवस वाढत असून तो कमी करण्यासाठी उपाय सापडत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आपल्या आयुष्यातील संकट सांभाळू शकत नसल्याचे ८०० पैकी २०४ डॉक्टरांना वाटत असल्याचे डॉक्टरांसोबत केलेल्या चर्चेतुन पुढे येत आहे.

गेल्या १५ वर्षांपासून सरकारी रुग्णालये आणि डॉक्टरांच्या संख्येमध्ये वाढ झाली नाही. रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढत असली तरी मात्र डॉक्टरांनी संस्था तितकीच आहे. त्यामुळे शासन सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांची संख्या न वाढवता खासगी डॉक्टरांना पाठिंबा देत आहे. याचा परिणाम डॉक्टरांच्या आरोग्याबरोबरच उपचाराच्या गुणवत्तेवरही होत आहे.

– डॉ. सागर मुंदडा, मार्ड असोसिएशन