मुंबईत सोमवारी ६,९०५ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर ४३ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांची संख्या गेल्या आठवड्याच्या तुलनेत खूपच कमी दिसत असली तरी रविवारी चाचण्या कमी झाल्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली आहे. रविवारी ३९,३९८ चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण १७.५२ टक्के  आहे. आशादायक बाब ही की एकाच दिवसात नऊ हजाराहून अधिक रुग्ण बरे झाल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या रविवारच्या तुलनेत घटली आहे.

सोमवारी ६९०५ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधितांची संख्या पाच लाख २७ हजार ११९ झाली आहे. एका दिवसात ९,०३७ रुग्ण  बरे झाल्यामुळे आतापर्यंत चार लाख २३ हजार ६७८ म्हणजेच ८० टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. करोनामुक्त रुग्णांची संख्या  फेब्रुवारीत ९४ टक्क्यांवर होती.  मात्र रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे हा दरही ७९ टक्यांपर्यंत कमी झाला होता. हा दर किं चित वाढून ८० टक्के  झाला आहे. मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढत असून, ती सध्या ९२ हजारांपुढे गेली होती. ती सोमवारी कमी होऊन  ९०,२६७ झाली आहे.  त्यापैकी ८२ टक्के  म्हणजेच ७५ हजार ८९३ रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत, तर १७ टक्के  म्हणजेच १५,२९९ रुग्णांना लक्षणे आहेत. गंभीर रुग्णांची संख्या १,२७२ झाली आहे.  करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे मुंबईतील चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. मात्र रविवारी ३९ हजार ३९८ चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांपैकी १७.५२ टक्के  नागरिक बाधित आहेत. या चाचण्यांपैकी ११,८०० प्रतिजन चाचण्या, तर २७,६०० आरटीपीसीआर चाचण्या आहेत.

३९,३०० जणांचे लसीकरण

मुंबई : सोमवारी ३९ हजार ३०० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्यापैकी ३२ हजार ८४३ जणांनी पहिली मात्रा घेतली. आतापर्यंत मुंबईत १७ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी एक लाख ९५ हजार लोकांना दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत.

मुंबईत सध्या १२० केंद्रावर लसीकरण सुरू आहे. त्यात खासगी ७१ पैकी केवळ ६२ केंद्रांवर सोमवारी लसीकरण झाले. बाकीची केंद्रे अपुऱ्या साठ्याअभावी बंद ठेवण्यात आली होती. सर्वाधिक लसीकरण २७ हजार १८४ हे पालिकेच्या ३३ केंद्रांवर झाले.

दरम्यान, मंगळवारपासून मुलुंडमध्ये आणखी एक खासगी लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार असून ते अगरवाल रुग्णालयात असणार आहे.

ठाणे जिल्ह््यात ४, ९७१ नवे रुग्ण

ठाणे : ठाणे जिल्ह््यात सोमवारी ४ हजार ९७१ नवे करोना रुग्ण आढळून आले, तर २६ जणांचा मृत्यू झाला. रुग्णांची संख्या दोन दिवसांच्या तुलनेत घटली असली तरी मृतांच्या संख्येत मात्र वाढ होत असल्याचे चित्र आहे.