भरधाव वेगात धावणाऱ्या ट्रकने शनिवारी सकाळी ऐरोलीजवळ बेस्टच्या बस क्रमांक ३४३ ला धडक दिली. या अपघातात बसवाहकासह सातजण जखमी झाले. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती बेस्टच्या सूत्रांनी दिली.
मरोळ डेपोची बस क्रमांक ३४३ शनिवारी सकाळी मुंब्रा येथून मरोळला जात होती. राष्ट्रीय महामार्गावरील ऐरोली येथे सकाळी ७.०५ च्या सुमारास साखरेच्या गोणींनी भरलेला ट्रक भरधाव वेगात धावणाऱ्या ट्रकने या बसला धडक दिली. त्यात बसमधील प्रवासी उत्तम सूर्यवंशी (४०) आणि बसवाहक जखमी झाले. त्यांना तात्काळ कळवा येथील शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बेस्टचे पाच बसचालक डेपोमध्ये जाण्यासाठी याच बसमधून प्रवास करीत होते. तेही या अपघातात जखमी झाले असून त्यांना वाशी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्याचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत.