अधिकाधिक मुंबईकरांना पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा करण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न असून २०२२ पर्यंत ७० टक्के घरांमध्ये पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा करण्यात येईल, असे केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेद्र प्रधान यांनी सांगितले.
प्रधान यांनी महानगर गॅस कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची रविवारी बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रधान म्हणाले, पाइपलाइनद्वारे घरगुती गॅसपुरवठय़ास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून प्राधान्य दिले आहे. त्यानुसार जास्तीत जास्त मुंबईकरांना घरगुती गॅसपुरवठा पाइपलाइनद्वारे करण्याचे नियोजन सरकार करीत आहे. त्यासाठी अभ्यास करण्यात येत असून हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिकेशीही चर्चा करण्यात येईल.
देशात सध्या १५ कोटी घरगुती गॅस जोडण्या आहेत. पण पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठय़ाच्या केवळ २० ते २२ लाख जोडण्या असून त्यापैकी सात लाख ३० हजार मुंबईत आहेत. पाइपद्वारे पुरविला जाणारा नैसर्गिक वायूचा पुरवठा सर्वात स्वस्त, पर्यावरणस्नेही व सुरक्षित इंधन असल्याचे प्रधान यांनी स्पष्ट केले. देशात सध्या सुमारे १५ हजार किमीची गॅस पाइपलाइन यंत्रणा असून पुढील १५ वर्षांत हे जाळे दुप्पट म्हणजे सुमारे ३० हजार किमी करण्याचे उद्दिष्ट मोदी सरकारने ठरविले असल्याचे प्रधान यांनी सांगितले. शहरांमधील स्मशानभूमीत लाकडे किंवा अन्य इंधनपुरवठय़ात अडचणी असल्याने गॅसपुरवठय़ाचे जाळे उभारण्यासाठी पावले टाकली जातील, अशीही माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, अधिकाधिक मुंबईकरांना पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा करण्यात यावा, सीएनजी सेंटरची संख्या वाढविण्यात यावी, यासह मुंबईकरांच्या विविध मागण्या आणि समस्यांबाबत मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी मुंबईतील खासदारांसमवेत प्रधान यांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी खासदार किरीट सोमय्या, गोपाळ शेट्टी, गजानन कीर्तिकर, अरविंद सावंत उपस्थित होते.