लोकलमधील आवाजाची पातळी ७० ते १०० डेसिबलपर्यंत; ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी रेल्वेमंत्र्यांना पत्र

रस्त्यावरील वाहतुकीच्याच नव्हे तर रेल्वे प्रवासादरम्यानही प्रवाशांना आणि रेल्वे परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना ध्वनिप्रदुषणाची समस्येला तोंड द्यावे लागत असल्याची गंभीर बाब एका पाहणीत समोर आली आहे. या पाहणीत रेल्वे प्रवासादरम्यान आवाजाची पातळी जवळपास ७० ते १०० डेसिबलपर्यंत नोंदली गेली. या ध्वनिप्रदूषणाचा प्रवाशांवर मानसिक परिणाम होत असून प्रवासातील चिडचिड, भांडणे यांना हेही एक कारण असल्याची शक्यता संस्थेने व्यक्त केली आहे.

मुंबईत रोज जवळपास ७५ लाखांहून अधिक प्रवास लोकलने प्रवास करतात. यातीलच काही प्रवाशांच्या तक्रारीवरून मुंबईतील ध्वनिप्रदूषणाच्या समस्येवर काम करणाऱ्या ‘आवाज फाऊंडेशन’ या संस्थेने मुंबईत हार्बर व मध्य रेल्वेच्या लोकल गाडय़ांमधून प्रवास करून त्या वेळच्या आवाजाची पातळी मोजली. जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांनुसार मानवाला ५५ डेसिबलपर्यंतचा आवाज ऐकण्यास काही अडचण नसते. मात्र, हा आवाज ८५ डेसिबलच्यावर गेल्यास त्याचा आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात. मुंबईतील रेल्वे प्रवासात गाडीमधील व स्थानकांमधील उद्धोषणा, गाडीच्या ब्रेकचा आवाज आणि भजनी मंडळांचा आवाज अशा वेगवेगळ्या आवाजांमुळे मोठय़ा प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

ज्या रेल्वे डब्यांमध्ये भजनी मंडळांची भजने सुरु असतात, त्या डब्यांमध्ये आवाजाची पातळी जवळपास १०० डेसिबलपर्यंत पोहचल्याची गंभीर बाब देखील या सर्वेक्षणात उघड झाली आहे. ‘या सर्वेक्षणाबाबत आम्ही रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना ट्विटर व ई-मेलद्वारे कळवले आहे. त्यांनीही यावर प्रतिसाद देत यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे,’ अशी माहिती ‘आवाज फाऊंडेशन’च्या संचालिका सुमैरा अब्दुलाली यांनी दिली.

९० ते १०० डेसिबलपर्यंतचा आवाज जर सतत काही काळ माणसाला ऐकावा लागला तर त्याचा त्या व्यक्तीच्या ऐकण्याच्या क्षमतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. प्रवासी इअरफोन लावून प्रवास करतात. ते त्यांच्यासाठी धोकादायक असते. भजनी मंडळे मोठे आवाज आरोग्यावर परिणाम करू शकतात.

 डॉ. निलम साठे, कान, नाक, घसा तज्ज्ञ, के. ई. एम. रूग्णालय

नविन गाडीतून सीएसटी ते ठाणे असा प्रवास (दिवस – २९ मार्च. वेळ-२ वाजून ४७ मिनिटे)

ठिकाण  आवाज (डेसिबलमध्ये)    कारण

सीएसटी स्थानक ८२.३   उद्धोषणा होत असताना

सीएसटी स्थानक ८८.८   उद्घोषणा होत असताना गाडी सुरु झाल्यावर

भायखळा स्थानकाजवळ   ८७.७   उद्धोषणा होत असताना

भायखळा स्थानक ९१.६   दुसरी गाडी बाजूने जात असताना

कुर्ला स्थानकाजवळ      ८२     उद्धोषणा होत असताना

मुलुंड ते ठाणे स्थानकादरम्यान    ८७     उद्धोषणा होत असताना