01 December 2020

News Flash

पालिका आयुक्त चहेल यांच्याच काळात लपले होते ७०० करोना मृत्यू !

लोकसत्ताने समोर आणली आकडेवारी

संदीप आचार्य 
मुंबई: मुंबई महापालिका रुग्णालयातील लपलेल्या ४५१ करोना मृत्यूंना तसेच मृत्यूचे विश्लेषण न झालेल्या ५०० हून अधिक मृत्यूंची माहिती लोकसत्ताने उघड केल्यानंतर शासनाने मुंबईत ८६२ मृत्यू झाल्याची कबुली दिली. मात्र त्याची नेमकी माहिती आता हाती आली असून यातील लपलेले तब्बल ७०० करोना मृत्यू हे इक्बाल सिंग चहेल यांनी आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर झाल्याचे उघडकीस आले आहे.

आपल्याला एकही करोना मृत्यू लपवायचा नाही असे सांगत राज्य सरकारने मंगळवारी मुंबई महापालिकेत मागील काळात ८६२ करोना मृत्यू झाले तर राज्यात अन्यत्र ४६६ असे एकूण १३२८ मृत्यू झाल्याचे जाहीर केले होते. मात्र हे मृत्यू नेमक्या कोणत्या कालावधीत झाले व त्यामागची कारणमिमांसा शासनाने काढलेल्या पत्रकात कुठेही स्पष्ट केलेली नाही. एवढेच नव्हे तर करोना मृत्यू लपवले असल्यास त्याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले होते. मात्र ‘लोकसत्ता’च्या हाती आलेली आकडेवारी काही वेगळच चित्र दाखवत असून याबाबत मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यापासून कोणीच तोंडही उघडायला तयार नाहीत.

तत्कालीन आयुक्त प्रवीण परदेशी यांची आठ मे रोजी तडकाफडकी बदली केल्यानंतर त्यांच्याजागी इक्बाल सिंग चहेल यांची पालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून १४ जूनपर्यंत च्या कालावधीत ७०० करोना रुग्णांचे मृत्यू झाले आहेत जे दाखवले गेले नव्हते. सरकारने ते अखेर काल मंगळवारी जाहीर केले. राज्य सरकारने याबाबत काढलेल्या पत्रकात मार्चपासून च्या सर्वच करोनामृत्यूंची पडताळणी करून १३२८ मृत्यूंचे समायोजन केल्याचे म्हटले आहे. यात मुंबईत ८६२ व राज्यात अन्यत्र ४६६ लपलेल्या करोना मृत्यूंचे समायोजन केल्याचे म्हटले आहे. मात्र मार्चपासून कोणत्या कालावधीत हे मृत्यू झाले तसेच मृत्यू दाखवण्यात नेमकी का दिरंगाई झाली याची कोणतीही कारण सरकारने दिली नाहीत की मुख्य सचिव व पालिका आयुक्तांनी सांगितली.

‘लोकसत्ता’ने नेमका हा कालावधी शोधला असून प्रवीण परदेशी आयुक्त असतानाच्या काळात १ एप्रिल २०२० ते ९ मे २०२० पर्यंतच्या कालावधीतील १७२ करोनमृत्यू झाले तर इक्बाल सिंग चहेलना यांनी ८ मे रोजी पदभार स्वीकारल्यानंतर १० मे ते १५ जून या कालावधीतील ६९० करोना मृत्यू झाले होते मात्र ते अधिकृतपणे दाखवण्यात आले नव्हते. यात १० मे ते १६ मे या काळात ११० करोना मृत्यू, १७ मे ते २३ मे या आठवड्यात १६९ मृत्यू, २४ मे ते ३० मे या काळात २२० करोना मृत्यू, ३१ मे ते ६ जून ११८ मृत्यू, ७ जून ते १३ जूनदरम्यान ५४ मृत्यू व १४ व १५ जून रोजी १९ असे ६९० करोना मृत्यूंचे विश्लेषण असून आजपर्यंत त्याची माहिती पालिकेने जाहीर केलेली नाही. यातील महत्वाची बाब म्हणजे ८ जून रोजी पालिकेने आरोग्य विभागाला एक मेल पाठवून ४५१ करोना मृत्यूंची यादी सादर केली होती.

मात्र त्यानंतर १२ जून रोजी पालिकेने आरोग्य विभागाला दुसरा मेल पाठवून हे ४५१ मृत्यू हे करोना मृत्यू नाहीत असे कळवले होते. पालिका आयुक्तपदी चहेल आल्यानंतर अवघ्या चारच दिवसात ४५१ मृत्यू हे ‘करोना मृत्यू’ नाही, असा साक्षात्कार पालिका अधिकाऱ्यांना कसा झाला, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. महत्वाचे म्हणजे पालिकेने १२ जून रोजी आरोग्य विभागाला मेल पाठवून जे मृत्यू नाकारले आहेत त्यांचा मंगळवारी जाहीर केलेल्या ८६२ करोना मृत्यूंमध्ये समावेशन केले अथवा नाही याची कोणतीही स्पष्टता शासनाने केलेली नाही. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात करोनाचे मृत्यू दाखवायचे का राहून गेले, याचीही अधिकृत माहिती सरकारने दिलेली नाही. याबाबत मुख्य सचिव अजोय मेहता व पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहेल यांच्याकडे विचारणा करूनही कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2020 4:59 pm

Web Title: 700 corona deaths were hidden municipal commissioner chahels tenure 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 नैराश्यावर बोलू काही! डॉ. तेजस्विनी कुलकर्णी ‘लोकसत्ताच्या फेसबुक’वर Live
2 मुंबईजवळच्या परिसराला भूकंपाचे हादरे; उत्तरेला होता केंद्रबिंदू
3 Video : मिनी गेट वे ऑफ इंडिया बघायचाय?
Just Now!
X