प्रसाद रावकर

रस्त्यावर मंडप बांधण्याकरिता परवानगी देण्याबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशावरून महापालिकेने तयार केलेल्या नियमावलीमुळे छोटय़ा गल्ल्यांमध्ये मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करणारी तब्बल ७०० मंडळे अडचणीत आल्याने त्यांच्याकरिता स्वतंत्र नियम करण्याची मागणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मुंबई महापालिकेकडे केली आहे.

मुंबईमध्ये मंडपामुळे वाहतूक आणि पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेत उच्च न्यायालयाने रस्त्यांवर मंडप उभारुन गणेशोत्सव साजरा करण्यास मनाई केली आहे. तसेच मंडपांबाबत धोरण आखण्याचे आदेश पालिकेला दिले होते. त्यानुसार पालिकेने धोरण आखून १२ मे २०१७ रोजी परिपत्रक जारी केले. मात्र दक्षिण मुंबईसह उपनगरांमधील अनेक छोटय़ा गल्ल्यांमध्ये गेली अनेक वर्षे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेने तयार केलेल्या धोरणामुळे गेल्या वर्षी मुंबईतील छोटय़ा गल्ल्यांमध्ये गणेशोत्सव साजरा करणारी ७०० हून अधिक मंडळे अडचणीत आली होती. मुख्य रस्त्यांशी जोडल्या गेलेल्या या गल्लांमधून तुरळक वाहतूक आणि पादचाऱ्यांची ये-जा सुरू असते. या गल्ल्यांमध्ये मंडप उभारण्याची परवानगी मिळावी म्हणून मंडळांनी गेल्या वर्षी पालिकेकडे अर्ज केले होते. परंतु मंडप उभारल्यानंतर वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी रस्ताच शिल्लक राहात नसल्यामुळे परवानगीचे घोडे अडले होते. गणेशोत्सव जवळ आला तरीही मंडपांना परवानगी मिळू शकली नव्हती. अखेर काही अटीसापेक्ष पालिकेने या मंडळांना परवानगी दिली. त्यानंतर घाईघाईत मंडप उभारुन मंडळांनी सजावटीचे काम हाती घेतले आणि गणेशोत्सव साजरा झाला.

यंदा पुन्हा या मंडळांच्या मंडप परवानगीचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे छोटय़ा गल्ल्यांमधील मंडप उभारणीसाठी धोरणात काही नियमांची तरतूद करावी, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने पालिका आणि वाहतूक पोलिसांना केली आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्याची तयारी उभय यंत्रणांनी दर्शविली आहे.

गेली अनेक वर्षे मुंबईमधील छोटय़ा गल्ल्यांमध्ये गणेशोत्सव साजरा होत आहे. या गल्ल्या मुख्य रस्त्यांना जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे तेथे तुरळक वाहतूक सुरू असते. मात्र या रस्त्यांवरील वाहतुकीसाठी पर्यायी मार्गही उपलब्ध आहेत. त्यामुळे या गल्ल्यांमध्ये मंडप उभारण्यासाठी काही नियम ठरवावे आणि मंडळांना मंडप परवानगी द्यावी, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी केली.

अडचणीची नियमावली?

* मंडप उभारणीमुळे वाहतूक आणि पादचाऱ्यांना अडथळा होऊ नये

* रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाची गाडी जाईल इतका मार्ग मंडपालगत मोकळा असायला हवा

* रेल्वे स्थानक आणि बस थांब्यांजवळ मंडप नको