29 September 2020

News Flash

महाराष्ट्रातील ७० हजार आशा कार्यकर्त्या आंदोलनाच्या तयारीत!

आतापर्यंत ६० हून अधिक आशांना करोनाची लागण

संदीप आचार्य 
मुंबई: राज्याच्या ग्रामीण आरोग्याचा कणा असलेल्या सुमारे ७० हजार आशा कार्यकर्त्या व गटप्रवर्तक आपले आरोग्य व उपजीविकेच्या मागण्यांसाठी आंदोलनाच्या तयारीत आहेत. या अशांनी आंदोलन केल्यास ग्रामीण भागातील करोनाची लढाई ठप्प पडू शकते अशी भीती आरोग्य विभागातील काही वरिष्ठ डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

राज्याच्या ग्रामीण भागात घराघरात जाऊन ७० हून अधिक प्रकारची आरोग्य विषयक कामे या आशा कार्यकर्त्या करत असतात. करोना काळात गेल्या पाच महिन्यात घरोघरी स्वत: चा जीव धोक्यात घालून या अशांनी आरोग्य सर्वेक्षणाचे काम केले आहे व आजही करत असताना या आशांना आरोग्य विभागाकडून पुरेसे मास्क, सॅनिटाइजर तसेच हातमोजे मिळत नसल्याचे राज्य आशा व गटप्रवर्तक संघटनेचे म्हणणे आहे. अनेक आशांनीही ‘लोकसत्ता’ बोलताना याला दुजोरा दिला. आम्हाला देण्यात आलेले हातमोजे सकाळी घातले तर दुपारी फाटलेले असतात असे या आशांचे म्हणणे आहे. घरोघरी जाऊन ताप आला आहे का तसेच ऑक्सिजनची मोजणी करताना चांगले मास्क मिळणे गरजेचे आहे. तसेच सॅनिटाइजर दिले पाहिजे मात्र या गोष्टी कधीतरी दिल्या जातात.

यातूनच आतापर्यंत ६० हून अधिक आशांना करोनाची लागण झाली तर कामाच्या तणावातून तीन आशांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे ‘महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन’चे महासचिव सलीम पटेल यांनी सांगितले. राज्यातील बहुतेक आशा कार्यकर्त्यांना जुलै महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही एवढेच नव्हे तर राज्य सरकारने १९ जुलै रोजी आदेश काढून दोन हजार रुपये देण्याच्या निर्णयाचीही अंमलबजावणी झालेली नाही. मुळातच आशांना अत्यंत तुटपुंज्या मानधनावर राबवून घेतले जाते. केंद्र सरकारकडून त्यांना दोन हजार रुपये मिळतात तसेच ७० प्रकारची आरोग्याची कामे करण्यासाठी कामानुसार वेगळे पैसे मिळतात. साधारणपणे एक आशा महिन्याला अडीच हजार ते साडेचार हजार रुपयांपर्यंत मानधन मिळवते. यात कुपोषित बालकाला रुग्णालयात दाखल करणे, गर्भवती महिलेच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांच्या नियमित तपासणी होतात की नाही यासह रुग्णालयात दाखल करण्यापर्यंत तसेच घरोघरी जाऊन आरोग्य विषयक विविध गोष्टींच सर्वेक्षण या आशांना करावे लागत आहे. करोनाच्या गेल्या पाच महिन्यात करोना सर्वेक्षणाची अतिरिक्त जबाबदारी या आशांना देण्यात आली असून यासाठी एक हजार रुपये देण्यात येत आहेत.

मात्र घरोघरी जाऊन गन द्वारे ताप मोजणे व ऑक्सिजनची चाचणी करण्यात असलेला थेट संपर्काची धोका लक्षात घेता पुरेसे एन ९५ मास्क, हातमोजे व सॅनिटाइजर मिळत नसल्याचे राज्य आशा व गटप्रवर्तक कृती समितीचे अध्यक्ष एम. ए. पाटील यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी आशांचा देशव्यापी आंदोलन झाले होते त्यात जवळपास सहा लाख आशा कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. आधीच तुटपुंजे मानधन मिळत असून सरकार तेही वेळेवर देणार नसेल तर कामबंद आंदोलन करावे लागेल असा इशारा एम. ए. पाटील यांनी दिला. आशा संघटनेचे पदाधिकारी दत्ता देशमुख यांच्या म्हणण्यानुसार सोलापूर व कोल्हापूर येथे अनुक्रमे २६०४ व ३००० हून अधिक आशा असून त्यातील ४१ आशांना करोनाची बाधा झाली आहे. आमच्याकडील माहितीनुसार ६० हून आशांना राज्यात करोनाची लागण झाली असून सध्या सगळीकडे संपर्क साधणे शक्य नसल्याने नेमकी माहिती मिळत नसली तरी ही संख्या खूप जास्त असल्याची भीती सलीम पटेल यांनी व्यक्त केली. त्यांच्या म्हणण्यानुसार करोनाबाधित डॉक्टर व परिचारिकांना मिळणारे उपचार व आमच्या आशांना मिळणार्या उपचारातही भेदभाव केला जातो.

करोना काळात आशा कार्यकर्त्यांना त्यांचे मानधन वेळेत न मिळणे ही क्रूर थट्टा असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आमच्या सरकारने आशांचे मानधन थेट बँकेत जमा करण्याची योजना आखली होती. तसेच पैसे नाहीत म्हणून मानधन नाही अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, याचीही काळजी घेतली होती असे सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले, आशा च्या आरोग्याची काळजी घेणे हे सरकारचे काम आहे. त्यांना पुरेसे मास्क, ग्लोव्हज व सॅनिटाइजरचा पुरवठा झालाच पाहिजे. विधान परिषदेतील विरोध पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही अशीच भावना व्यक्त करताना आशांना करोनाच्या लढाईत आरोग्य सुविधा का मिळत नाही, याची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच आपण याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचे सांगितले. याबाबत आरोग्य विभागाच्या संचालकांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 4:55 pm

Web Title: 70000 asha activists in maharashtra preparing for agitation scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 महाराष्ट्र पोलिसांनी सुशांत सिंहच्या वडिलांवर केला हा गंभीर आरोप
2 मुंबई पोलीस रियाला वाचवण्याच्या प्रयत्नात, सुशांतच्या वडिलांचा आरोप
3 Coronavirus : मुंबई, ठाण्यात करोना नियंत्रणाकडे..
Just Now!
X