बोरिवलीत ७०१ खड्डे असल्याची सामाजिक कार्यकर्त्यांची पाहणी; मात्र केवळ आठ ते दहाच खड्डे असल्याचा पालिकेचा दावा

मुंबई : संपूर्ण शहरात खड्डय़ांच्या फक्त एक हजार तक्रारी आल्याचा आणि त्यातील ९० टक्के खड्डे बुजवल्याचा दावा पालिका उच्च न्यायालयात करत असतानाच फक्त बोरिवली उपनगरातील काही भागांतच तब्बल ७०१ खड्डे मोजून सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिकेला खड्डय़ांची जागा दाखवली आहे. कार्यकर्त्यांनी केवळ तीन दिवसांत हे खड्डे मोजले असून त्यांची छायाचित्रेही काढण्यात आली. मात्र हे खड्डे पालिकेच्या व्याख्येत बसत नसून संपूर्ण बोरिवलीत केवळ आठ ते दहा खड्डेच असू शकतात, असा दावा प्रशासनाने केला आहे.

नवीन रस्ते आणि जुन्या रस्त्यांचा पृष्ठभाग नव्याने करण्यासाठी दरवर्षी दोन ते अडीच हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येते. मात्र त्यानंतरही पावसाच्या पहिल्या फटक्यात मुंबईचे रस्ते खड्डेमय होऊन जातात. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात संततधार लागलेल्या पावसाने रस्त्यांवर खड्डय़ाचे पीक फोफावले. या वर्षी पालिकेने खड्डय़ांची एकूण आकडेवारी दिलेली नाही. मात्र संपूर्ण शहरातून खड्डय़ांच्या केवळ १०५० तक्रारी आल्या आणि त्यातील ९० टक्क्यांहून अधिक खड्डे बुजवण्यात आले, असे पालिकेकडून सांगण्यात आले. मात्र हा दावा पोकळ आहे, ते बोरिवलीतील मीरा कामत यांनी दाखवून दिले. गेल्या आठवडय़ात तीन दिवस रिक्षातून फिरून त्यांनी रस्त्यांवरील खड्डय़ांची छायाचित्रे घेत मोजणी केली, तेव्हा या परिसरात ७०१ खड्डे असल्याचे वास्तव समोर आले.

नालेही उघडे

या पाहणीत बोरिवलीतील स्वामी विवेकानंद रस्ता (एस. व्ही. रोड) येथे सर्वाधिक खड्डे आढळले. त्याचप्रमाणे टेलिफोन आणि अन्य खोदकामादरम्यान केलेले खड्डे व्यवस्थित न बुजवल्यामुळे  तेथे पुन्हा खड्डे तयार झाले. शिंपोली, गावदेवी परिसरांतील पदपथावर नाल्यावरील झाकणेच गायब असल्याचे दिसले. बोरिवली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकपासून मोक्ष प्लाझापर्यंतच्या रस्त्यावर जागोजागी पेव्हर ब्लॉकमुळे खड्डे पडले आहेत. यामुळे दुचाकीचालकांना अधिक त्रास होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या. बोरिवली पूर्वेचे सर्व कार्टर रोड, कस्तुरबा रोड ते राजेंद्र नगपर्यंत आणि एसव्ही रोड परिसरात हे खड्डे मोजले असून पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि त्या पलीकडील रस्ते किंवा पश्चिमेकडील लिंक रोडच्या पलीकडच्या रस्त्यांचाही यात समावेश नाही.

२५ जुलै, २७ जुलै व २८ जुलै रोजी रिक्षातून फिरत हे खड्डे मोजले. रस्त्यांवरील खड्डय़ांबाबत पालिकेच्या आर मध्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या. खड्डे बुजवल्याचा दावा अधिकारी करत मात्र प्रत्यक्षात खड्डे तसेच होते. गेल्या काही दिवसांत खड्डे नागरिकांच्या जीवावर बेतू लागले. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी खड्डे बुजवल्याचा केलेला दावा कसा खोटा आहे हे समोर आणण्यासाठी सर्व रस्त्यांची पाहणी केली.

– मीरा कामत, सामाजिक कार्यकर्त्यां

मीरा कामत यांनी केलेला ७०१ खड्डय़ांचा दावा खोटा आहे. त्यांनी काढलेल्या छायाचित्रांमधील खड्डे हे पालिकेच्या खड्डय़ांच्या व्याख्येत बसत नाही. बोरिवलीत फारतर १० ते १५ खड्डे असू शकतात, तेदेखील आम्ही बुजवण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच त्यांना दिसलेले काही खड्डे हे खासगी किंवा कच्चा रस्ता, पश्चिम द्रुतगती महामार्गावरील असू शकतील, ते आमच्या हद्दीत येत नाही.

– रमाकांत बिरादार, सहायक आयुक्त, आर मध्य विभाग, महापालिका