कारागृहातील आपल्या चांगल्या वर्तनाचा हवाला देत आमच्यापासून समाजाला काहीही धोका नाही, आम्हाला सुधारण्याची संधी द्या, असा दावा मुंबईच्या उपनगरीय लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडविल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या १२ आरोपींनी सोमवारी विशेष ‘मोक्का’ न्यायालयाकडे करत शिक्षेत दया दाखविण्याची विनंती केली.
शिक्षेबाबतचे म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयाने सोमवारी एक-एक करून प्रत्येक आरोपीला पाचारण केले. त्या वेळी या आरोपींनी कारागृहातील आपल्या चांगल्या वर्तनाचा हवाला दिला. तसेच आमच्यापासून समाजाला धोका नाही, आम्हाला सुधारण्याची संधी द्या, आमच्या खांद्यावर कुटुंबाची, मुलांची जबाबदारी आहे, असा दावा करीत आरोपींना कमी शिक्षा करण्याची विनंती न्यायालयाकडे केली.
ही प्रक्रिया पार पडल्यानंतर आता त्यांना नेमकी काय शिक्षा दिली जावी, याबाबत सरकारी तसेच आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद न्यायालय ऐकेल व नंतर शिक्षा सुनावली जाईल. सुनावणीत न्यायालयाने शिक्षेबाबतचा सरकारी व आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू होण्याची प्रक्रिया म्हणून आरोपींना शिक्षेबाबत म्हणणे मांडण्यास सांगितले.