मुंबईच्या ७/११ साखळी बॉम्बस्फोटात दोषी ठरलेल्या १२ पैकी पाच दोषी आरोपींना फाशीची तर, उर्वरित सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. तब्बल ९ वर्ष चाललेल्या या सुनावणीत या खटल्यातील १३ पैकी १२ आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर त्यातील बॉम्ब ठेवणारे आणि बॉम्ब कुठे ठेवण्यात यावे याचा निर्णय घेणाऱया आठ आरोपींना फाशी देण्याची मागणी सरकारी पक्षातर्फे करण्यात आली होती. पण आज झालेल्या सुनावणीत विशेष मोक्का न्यायालयाने १२ आरोपींपैकी कमल अन्सारी, एहतशाम सिद्दीकी, मोहम्मद शेख, नावेद हुसैन खान, आतिफ बशीर खान या पाच आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. या पाच आरोपींवर प्रत्यक्ष कटात सहभाग, कटाची आखणी करणे आणि बॉम्ब ठेवण्याचे आरोप सिद्ध झाले. उर्वरित सात जणांना कटात सहभागी असल्याच्या आरोपीखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
दरम्यान, विशेष मोक्का न्यायालयाने दिलेल्या या निर्णयावर बचाव पक्षाचे वकिल आणि आरोपींच्या नातेवाईकांनी  नाराजी व्यक्त केली असून उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. ११ जुलै २००६ रोजी पश्चिम उपनगरीय लोकलमध्ये १० मिनिटांच्या कालावधीत पश्चिम रेल्वेवरील खार रोड-सांताक्रुझ, बांद्रा-खार रोड, जोगेश्वरी- माहिम जंक्शन, मीरा रोड- भाईंदर, माटुंगा- माहिम या स्थानकांदरम्यान आणि बोरिवली स्थानकामध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते.  यात १८९ निरपराध मुंबईकरांचा मृत्यू तर, ८०० हून अधिक जण जखमी झाले होते.