राज्यात गेल्या २४ तासांत ७,१८८ रुग्ण करोनामुक्त झाले असून, बरे झालेल्यांची एकूण संख्या १,८२,२१७ झाली आहे.

राज्यात गेल्या २४ तासांत ८,३६९ नव्या रुग्णांचे निदान झाले. सध्या मुंबई आणि ठाणे जिल्ह्य़ापेक्षा पुण्यात जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात करोनामुळे २४६ जणांचा मृत्यू झाला. सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये मुंबईत (२३,७०४), ठाणे जिल्हा (३६,२१९)तर पुणे जिल्ह्य़ात ३६८१० रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत मुंबई (९९२), पुणे (१६७८), पिंपरी-चिंचवड (७०८), कल्याण-डोंबिवली (३०४), ठाणे (२१२) रुग्ण आढळले.

देशात ३७ हजार नवे रुग्ण

देशात सलग पाचव्या दिवशी करोनाच्या रुग्णांमध्ये ३० हजारांहून अधिक वाढ नोंदविण्यात आली. गेल्या २४ तासांमध्ये देशात ३७ हजार १४८ रुग्णांची भर पडली. त्यामुळे देशातील करोना रुग्णांची एकूण संख्या ११ लाख ५५ हजार १९१ झाली आहे. देशातील मृतांचा आकडा २८ हजार ८४ वर पोहोचला आहे.

करोनाबाधितांचे प्रमाण पाच टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य

नवी दिल्ली : गेल्या तीन महिन्यांत देशात केलेल्या करोना चाचण्यांपैकी ८.०७ टक्के जण बाधित असल्याचे गेल्या स्पष्ट झाले आहे. हे प्रमाण पाच टक्क्यांवर आणण्याचे प्रमुख लक्ष्य असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी स्पष्ट केले.

समूह संसर्ग नाही

जागतिक आरोग्य संघटनेने समूह संसर्गाची ठोस व्याख्या केलेली नाही. मात्र, एखाद्या रुग्णाला कोणाच्या संपर्कात आल्यामुळे बाधा झाली असावी, याचा शोध घेता येत नाही अशी स्थिती उद्भवण्याला समूह संसर्ग म्हणता येईल. अशी परिस्थिती अजूनही देशात निर्माण झालेली नाही. देशातील काही ठिकाणी करोनाचा जास्त प्रादुर्भाव झालेला दिसतो, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे विशेष अधिकारी राजेश भूषण यांनी सांगितले.