सेफ्टी शूजच्या खरेदी प्रस्तावावरून बुधवारी स्थायी समितीत नगरसेवकांनी प्रशासनाला पाऊणतास धारेवर धरल्यावर प्रत्यक्षात मात्र परेड शूजची खरेदी होत असल्याचे स्पष्ट झाले. काळबादेवी दुर्घटनेनंतर प्रशासनाकडून तातडीने आणलेला बुटखरेदीचा प्रस्ताव हा अग्निशमन दलातील जवानांसाठी नाही तर गॅरेज व देखभाल विभागातील कर्मचाऱ्यांसाठी होता.
काळबादेवी येथील गोकुळ हाऊस आग दुर्घटनेत शनिवारी दोघा अग्निशमन अधिकाऱ्यांचा बळी गेल्यावर बुधवारी स्थायी समितीत विचारासाठी आलेल्या सेफ्टी शूजच्या खरेदीवरून दोन दिवस जोरदार चर्चा रंगली होती. आग लागल्यावर प्रशासनाला जाग आल्याबद्दलही अनेकांनी नाराजी व्यक्त केली. स्थायी समितीत आलेल्या या पहिल्याच प्रस्तावावर सर्वच पक्षांच्या सदस्यांनी बेधडक मते मांडली. बाजारात चार ते पाच हजार रुपयांना स्पोर्ट शूज मिळत असताना केवळ ८२८ रुपयांमध्ये आगीपासून वाचवणारे बूट खरेदी करून अग्निशमन दलातील जवानांचा जीव धोक्यात घातला जात आहे, असा आरोप सेनेच्या अनुराधा पेडणेकर यांनी केला. या बुटांची अग्निप्रतिबंधक चाचणी करण्यात आली आहे का, ती कुठून केली, त्याचे निकष कोणते असे प्रश्न मनसे गटनेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केले. अग्निशमन दलासाठी साधने घेताना केवळ कमी किमतीत वस्तू उपलब्ध होण्याचा निकष लावला जाऊ नये, असा मुद्दा काँग्रेसच्या असिफ झकेरिया यांनी मांडला.
पाऊण तास सुरू असलेल्या शूज खरेदी प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी मात्र ही खरेदी अग्निप्रतिबंधक बुटांची नसून परेड व ड्रीलसाठी वापरल्या जाणाऱ्या बुटांची आहे, असे स्पष्ट केले. गॅरेज तसेच देखभाल विभागातील कर्मचाऱ्यांसाठी हे बूट खरेदी केले जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आल्यावर या आधीच्या चर्चेतील सारा नूरच पालटला. ९१ लाख रुपये खर्च करून ११ हजार जोडय़ांची खरेदी करण्यात येणार आहे. अंदाजित दरापेक्षा ३४ टक्के कमी किंमत लावलेल्या राजस्थान युनिफॉर्म क्लोथिंग कंपनीला हे कंत्राट देण्यात आले.