मुंबईतील रुग्णांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी ७०० पेक्षा जास्त आली आहे. गुरुवारी ७३६ नवीन रुग्णांची नोंद झाली. मृतांची संख्या मात्र सुदैवाने कमी असून गुरुवारी चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

गुरुवारी ७३६ नवीन रुग्ण आढळल्यामुळे एकूण बाधितांची संख्या ३,१६,४८७ झाली आहे, तर एका दिवसात ४७३ रुग्ण बरे झाले. त्यामुळे आतापर्यंत २ लाख ९७ हजाराहून अधिक म्हणजेच ९४ टक्के  रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्याही हळूहळू वाढू लागली असून सध्या ६,२०१ रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यापैकी सुमारे ३,९६३ रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत, तर सुमारे १७०० रुग्णांना लक्षणे आहेत, तर २५७ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे मुंबईतील चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. बुधवारी २२,४०० चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी चार टक्कय़ांहून अधिक अहवाल बाधित आले आहेत. आतापर्यंत ३० लाख ८० हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत.

रुग्णांचा मृत्यू

गुरुवारी चार रुग्णांचा मृत्यू झाला असून हे चारही पुरुष होते. दोघांचे वय ६० वर्षांवर होते. मृतांची एकूण संख्या ११,४३० वर गेली आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा दर ०.१७ टक्के  झाला असून रुग्णदुपटीचा कालावधीही ४१७ दिवसांपर्यंत खाली गेला आहे. मुंबईत आता सर्वच भागांत रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. मुलुंड, वांद्रे, चेंबूर, वडाळा, सायन, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, ग्रँट रोड, भांडुप, देवनार या भागांत रुग्णवाढ सर्वात अधिक आहे.  एका दिवसात पालिकेने रुग्णांच्या निकटचे ७,६८२ संपर्क शोधले आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात ५०६ करोनाबाधित

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्य़ातील करोना रुग्णसंख्येत घट होत असताना गुरुवारी ५०६ करोना रुग्ण आढळले. तर पाच जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्ह्य़ातील महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना मुखपट्टीचा वापर करणे तसेच गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.गुरुवारी जिल्ह्य़ात ५०६ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. यात ठाणे महापालिका क्षेत्रात २०१, कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात १३२, नवी मुंबई ९३, ठाणे ग्रामीण क्षेत्रात ३०, मिराभाईंदर २४, बदलापूर १२, अंबरनाथ आठ, उल्हासनगर येथे सहा रुग्ण आढळून आले. भिवंडीत एकही करोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. तर, जिल्ह्य़ातील पाच मृतांपैकी ठाण्यातील दोन, नवी मुंबईतील दोन आणि कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील एका रुग्णाचा सामावेश आहे.

महिलेविरोधात नियमोल्लंघनाचा गुन्हा

मुंबई : करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे उल्लंघन के ल्याप्रकरणी पवईतील एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिके च्या एल विभाग कार्यालयाने ही कारवाई के ली आहे. प्रतिबंधित करण्यात आलेल्या मजल्यावर ही महिला राहत होती. मात्र प्रतिबंधित कालावधी संपण्याच्या आतच ती मुंबईबाहेर गेली. तिच्या घरी काम करणारी महिला श्वानाला घेऊन रोज फिरायलाही जात असल्याचेही आढळून आले .  मुंबईत रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालिके ने सर्वच निर्बंध आता कडक केले आहेत. पहिल्याच दिवशी पालिके ने एका महिलेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल के ली आहे. पवई येथील एव्हरेस्ट हाईट या इमारतीतील एक रहिवासी करोनाबाधित झाले होते. १४ फे ब्रुवारीला त्यांचा अहवाल आला होता. त्यामुळे ते राहत असलेला मजला पालिके च्या एल विभागाने प्रतिबंधित के ला. या मजल्यावरील अन्य रहिवाशांनाही कोणीही वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर जाऊ नये असे सांगण्यात आले होते. तशा सूचना सोसायटीच्या व्यवस्थापक आणि सचिवांना देण्यात आल्या होत्या. तसेच या मजल्यावर तसा फलकही लावण्यात आला होता, अशी माहिती एल विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र जाधव यांनी दिली.

दरम्यान, १७ फे ब्रुवारीला पालिके चे पथक पाहणीसाठी गेले असता रुग्णाच्या मजल्यावर राहणारी कामिया वर्मा ही महिला प्रतिबंधित क्षेत्राचे नियम धुडकावून परवानगी न घेताच मुंबई बाहेर गेल्याचे आढळून आले. ही महिला गुरुवारीही परतली नव्हती, असे या पथकाला समजले. त्यामुळे अखेर या पथकाने तिच्याविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ ब अन्वये व साथरोग नियंत्रण कायद्यान्वये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच या महिलेच्या घरी काम करणारी महिला दररोज सायंकाळी कु त्र्याला फिरवण्यासाठी ये-जा करीत असल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

नागरिकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे मुंबईत करोनाचे रुग्ण वाढत असून संसर्गाचा धोका वाढत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेऊन करोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अशा परिस्थितीत लोकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव यांनी केले आहे. नाहीतर नाइलाजास्तव आम्हाला कारवाई करावी लागते, असेही ते म्हणाले.