नातेवाईकांच्या आरोपामुळे रुग्णालय, प्रयोगशाळांच्या अहवालाबाबत प्रश्नचिन्ह

मुंबई : नागपाडा येथील ७४ वर्षीय व्यक्ती करोनाबाधित नसूनही डोंगरी येथील खासगी रुग्णालयाने करोनाचे उपचार दिले असून फसवणूक केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याविरोधात डोंगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

श्वास घेण्यास त्रास होत असल्याने अब्दुल पावसकर (७४) यांची त्यांच्या मुलाने फॅमिली डॉक्टरांकडे ३ सप्टेंबरला तपासणी केली. डॉक्टरांच्या सल्लय़ानुसार केलेल्या सीटी स्कॅनमध्ये त्यांच्या फुप्फुसावर परिणाम झाल्याचे दिसले. परंतु त्यांना करोना संसर्ग झाला नसून धूम्रपान करत असल्याने संसर्ग झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तरीही खात्री करण्याकरिता मेट्रोपोलिस आणि थायरोकेअर दोन प्रयोगशाळांत करोना चाचणीसाठी त्यांचे नमुने दिले. त्याच रात्री श्वास घेण्यास अधिक त्रास होत असल्याने डोंगरीमधील हबीब रुग्णालयात दाखल केले. अहवाल नसल्याने त्यांना बिगर करोना विभागात दाखल केले. दुसऱ्या दिवशी मेट्रोपोलिसच्या अहवालात ते बाधित नसल्याचे आढळले. हा अहवाल रुग्णालयाला दिला. त्यानुसार उपचार सुरू केल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. मात्र त्याच दिवशी थायरोकेअरच्या अहवालात करोनाबाधित असल्याचे आढळले. पण डॉक्टरांनी त्यांना करोना नसल्याचे स्पष्ट केले, असे त्यांचा मुलगा तारिक पावसकर यांनी सांगितले.

दुसरीकडे करोना रुग्णांसाठीची रेमडेसिवीर, टोसीलीझुमॅब ही औषधे लागणार असल्याने ती आणून देण्याची मागणी रुग्णालयाने पावसकर कुटुंबीयांकडे केली. ही औषधे आमच्याकडे आहेत, तुम्ही फक्त पैसे भरा, असे रुग्णालयाने सांगितले. त्याचे ४८,५०० रुपये रुग्णालयाने घेतले. आश्चर्य म्हणजे वडिलांचा ६ सप्टेंबरला मृत्यू झाल्यानंतर करोना रुग्णाप्रमाणे मृतदेह बंदिस्त करून दिला. याबाबत विचारणा के ली असता रुग्णालयाने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु रुग्णालयाने दिलेल्या मृत्युपत्रावर करोनाबाधित लिहिल्याचे पाहून आम्हाला धक्का बसला. माझ्या वडिलांना करोना झाला होता, तर रुग्णालयाने लपविले का आणि करोना झालेला नसेल तर करोनाचे उपचार का दिले, असा प्रश्न पावसकर यांनी उपस्थित केला आहे. रुग्णालयाने फसवणूक केली असून उपचारांच्या नावाखाली औषधांच्या खर्चाशिवाय पावणे दोन लाख रुपयांचे बिल केले. त्यामुळे रुग्णालयावर कठोर कारवाई करण्याची तक्रार पावसकर यांनी डोंगरी पोलीस ठाण्यात केली आहे. यासंबंधी हबीब रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.

रुग्णालयावर आरोप

करोनाची बाधा झालेली नसूनही ४८ हजारांची रेमडेसिवीर आणि अन्य औषधे दिल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले. याशिवाय बिलामध्येही करोना आणि बिगर करोना असे दोन्ही प्रकारच्या अतिदक्षता विभाग आणि सेवकांचे ५० हजारांपेक्षा अधिक दर लावले आहेत. मृतदेह बंदिस्त करून देण्याचे ४५०० रुपये आकारले आहेत.