15 July 2020

News Flash

वरळी कोळीवाडय़ातील ७५ टक्केभाग ‘प्रतिबंध’मुक्त

कोळीवाडय़ातील ७५ टक्केभाग प्रतिबंधित क्षेत्रांच्या यादीतून मुक्त करण्यात आला आहे.

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : करोनाबाधितांची संख्या वाढू लागल्यामुळे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेल्या वरळी कोळीवाडय़ातील रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यात महापालिका यशस्वी झाली असून कोळीवाडय़ातील ७५ टक्केभाग प्रतिबंधित क्षेत्रांच्या यादीतून मुक्त करण्यात आला आहे. मात्र रहिवाशांनी एकमेकांपासून सुरक्षित अंतर पाळण्याच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

वरळी कोळीवाडय़ातील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे पालिकेच्या जी-दक्षिण विभागाने २९ मार्च रोजी वरळी कोळीवाडा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला. वरळी कोळीवाडय़ात जाणाऱ्या सर्व वाटा बंद करण्यात आल्या. करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून नागरिकांवर निर्बंध घालण्यात आले. त्याचे परिणाम आता दिसू लागले असून आजघडीला वरळी कोळीवाडय़ातील ७५ टक्के भागात करोनाचा एकही रुग्ण नाही. त्यामुळे प्रशासनाने कोळीवाडय़ातील हा ७५ टक्के भाग प्रतिबंधित क्षेत्रातून मुक्त केला आहे. तथापि, करोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे सामाजिक अंतराबाबतच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पालिकेने कोळीवाडय़ातील रहिवाशांना केले आहे.

प्रतिबंधित क्षेत्राच्या यादीतून मुक्त केलेल्या भागात आवश्यक ती दुकाने आणि भाजीपाला विक्रीलाही परवानगी देण्यात आली आहे. मात्र करोनाच्या संसर्गाचा प्रसार होवू नये यासाठी सामाजिक अंतराबाबतचे नियम पाळणे बंधनकारक आहे. या संदर्भात वरळी कोळीवाडय़ातील नेते मंडळी, पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. टाळेबंदी आणि सामाजिक अंतराबाबतचे नियम पाळण्याबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी वरळी कोळीवाडय़ातील नेते मंडळींवर सोपविण्यात आल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

वरळी कोळीवाडय़ातील २५ टक्केभागात एखाद दुसरा नवा रुग्ण आढळत आहे. मात्र त्यांना तात्काळ अलगीकरणात पाठविण्यात येत आहे. वरळी कोळीवाडा आणि जिजामाता नगरमधील सुमारे ८० टक्के रुग्ण बरे झाले  आहेत.

टाळेबंदीचे नियम  बंधनकारक

प्रतिबंधित भाग: वरळी कोळीवाडय़ातील अचानक क्रीडा मंडळ, गोलफादेवी; सोनापूर लेन; अमर प्रेम चौक; तरे हाऊस; अरुण प्रकाश संगाच्या समोरचा परिसर, गोल्फादेवी; लॉरेन्स कीणी हाऊस, कोळीवाडा; थॉमस कीणी हाऊस; ओमकार निवास; डॉमिनिक कीणी चाळ; पारिख रेन; नवजीवन वसाहत, वरळी किल्ला; सुकूर मास्टर चाळ. तर जनता कॉलनी साईकृपा सेवा मंडळ; अमर संदेश स्पोर्टस् क्लब; इमारत क्रमांक ४२ च्या मागे ९४, ४८/५०, सागरदर्शन; साईबाबा मंदिर; उदय क्रीडा मंडळ; गोल्डन क्रीडा मंडळ.

वरळी कोळीवाडय़ातील रहिवाशांनी सहकार्य केले. त्यामुळेच साथीवर नियंत्रण मिळवता आले आणि  ७५ टक्के भाग प्रतिबंधित क्षेत्रांच्या यादीतून वगळणे शक्य झाले. जिजामाता नगरमध्येही २६ दिवसांपासून एकही रुग्ण सापडलेला नाही. बीबीडी चाळीत रुग्ण सापडत आहेत.  संसर्ग रोखण्यासाठी तेथील रहिवाशांनी सहकार्य करावे.

– शरद उघाडे, सहाय्यक आयुक्त, जी-दक्षिण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2020 2:54 am

Web Title: 75 percent of worli koliwada is restriction free zws 70
Next Stories
1 मुंबईतील करोना मृत्युप्रमाण ३.२ टक्के
2 मंत्री अस्लम शेख यांच्या वाहनचालकास करोना
3 शाळा नाहीत तरी जूनपासून शिक्षण सुरू
Just Now!
X