अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी घसघशीत तरतूद

देशाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पातच रेल्वे अर्थसंकल्पाचे विलीनीकरण केल्यामुळे अर्थसंकल्पाच्या दिवशी मुंबईकरांना नेमके काय मिळाले, याबद्दल असलेली संभ्रमावस्था अखेर शुक्रवारी दूर झाली. मुंबईकर रेल्वे प्रवाशांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तब्बल ६३६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी ४११ कोटी एमयूटीपी-३ आणि १३७ कोटी एमयूटीपी-२ या प्रकल्पासाठी केंद्राकडून येणार असून तेवढीच रक्कम राज्य सरकारही देणार आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी केवळ ‘हवेतले स्वप्न’ असलेले अनेक प्रकल्प प्रत्यक्षात उतरण्याच्या कामाला गती मिळणार आहे.

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी साडेपाच हजार कोटींपेक्षा जास्त तरतूद अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली. यात मुंबईच्या उपनगरीय रेल्वेसाठी ७५० ते ८०० कोटी रुपयांची तरतूद आहे. हा निधी एमआरव्हीसी, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे अशा तीन संस्थांकडे दिला जाणार आहे.

एमयूटीपी-३

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई महापालिका  निवडणुकांच्या  पाश्र्वभूमीवर मुंबईत येऊन घोषणा केलेल्या या योजनेसाठी केंद्राने ४११ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारही एवढाच निधी देणार असल्याने ही रक्कम ८२२ कोटी रुपये एवढी असेल. या योजनेत वसई-विरार चौपदरीकरण, पनवेल-कर्जत उपनगरीय दुहेरी मार्गिका, कळवा-ऐरोली उन्नत जोडमार्ग या मोठय़ा प्रकल्पांबरोबरच नवीन गाडय़ा व रेल्वे रूळ ओलांडण्यास प्रतिबंध यांचाही समावेश आहे.

एमयूटीपी-२

बहुप्रतीक्षित एमयूटीपी-२ प्रकल्पातील दिवा-ठाणे पाचवी-सहावी मार्गिका, सीएसटी-कुर्ला पाचवी-सहावी मार्गिका आणि अंधेरी-गोरेगाव हार्बर मार्गाचा विस्तार हे तीन प्रकल्प अजूनही पूर्ण झालेले नाहीत. या योजनेसाठी १३७ कोटी रुपयांची तरतूद यंदा करण्यात आली आहे. या निधीला राज्य सरकारकडून येणाऱ्या १३७ कोटी रुपयांची जोड मिळणार असून २७४ कोटी रुपयांच्या माध्यमातून दिवा-ठाणे प्रकल्पाला गती मिळणार आहे. तसेच सीएसटी-कुर्ला प्रकल्पातील परळ टर्मिनससाठी निधी खर्च होणार आहे.

वसई-विरार-पनवेल

आतापर्यंत फक्त चर्चेत असलेल्या या प्रकल्पाचा समावेश केंद्रीय अर्थसंकल्पात केल्याने हा प्रकल्प मार्गी लागणार आहे. ८७ कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात केवळ १० लाख रुपयांची तरतूद केली आहे, पण या निधीपेक्षाही हा प्रकल्प अर्थसंकल्पाच्या पटलावर येणे महत्त्वाचे होते.

इतर प्रकल्प आणि निधी

कल्याण-कसारा यांदरम्यान तिसऱ्या मार्गिकेचे काम गेल्या वर्षीच सुरू झाले असले, तरी यंदाच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी तब्बल ७० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. कळंबोलीतील नवीन कोचिंग टर्मिनसच्या कामासाठीही २५ कोटींचा निधी देण्यात आला आहे. याशिवाय प्रवासी सुविधांसाठी ८३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

उन्नत रेल्वेमार्ग

बहुचर्चित सीएसटी-पनवेल आणि वांद्रे-विरार या दोन्ही उन्नत रेल्वेमार्गानाही या अर्थसंकल्पात स्थान मिळाले आहे. त्यापैकी वांद्रे-विरार हा रेल्वेमार्ग सार्वजनिक-खासगी भागीदारीत बांधण्याचा विचार आहे.

सीवूड-उरणलाही गती

उरणलाही मुंबईशी जोडण्यासाठी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडप्रमाणे रेल्वेही प्रयत्न करत आहे. त्यासाठी सीवूड-उरण या मार्गाचे बांधकाम चालू असून या प्रकल्पासाठी यंदा ६६ कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. हा प्रकल्प यंदाच्या डिसेंबपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.