राज्यातील विजेची मागणी भागवण्यासाठी ‘महावितरण’ने येत्या दोन महिन्यांसाठी ७५० मेगावॉट वीज बाजारपेठेतून खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे उन्हाळय़ातील विजेची तूट नियंत्रणात राहण्यास मदत होणार आहे. राज्यात सध्या विजेची मागणी सरासरी साडे चौदा हजार मेगावॉट आहे. तर उपलब्धता पावणे चौदा हजार मेगावॉटच्या आसपास असते. त्यामुळे सुमारे ७०० ते ८०० मेगावॉट विजेची तूट राहून मर्यादेपेक्षा जास्त वीजचोरी असलेल्या भागांत भारनियमन करण्यात येते. गेल्या दोन-तीन महिन्यांत सुमारे ६५० मेगावॉट वीज अल्पकालीन तत्त्वावर खरेदी करण्यात आली होती. त्या कराराची मुदत ३० एप्रिल रोजी संपली. त्यामुळे विजेची तूट नियंत्रणात राहावी यासाठी मे व जून या दोन महिन्यांसाठी ७५० मेगावॉट वीज अल्पकालीन वीजखरेदी कराराच्या माध्यमातून घेण्यासाठी ‘महावितरण’ने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.