मुंबई : भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव राज्यात विविध उपक्रम, कार्यक्रमांच्या माध्यमातून १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत साजरा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी ग्रामस्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत विविध समित्यांची स्थापन करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव राज्यभर कशा पद्धतीने साजरा करायचा, याबाबत सांस्कृतिक कार्य विभागाने सविस्तर सादरीकरण केले. या महोत्सवाची आखणी, नियोजन व प्रभावी अंमलबजावणी याकरिता राज्यस्तरीय समिती, कोअर समिती, अंमलबजावणी समिती, जिल्हास्तरीय समिती, पंचायत व ग्रामस्तर समिती अशा विविध समित्या स्थापन करण्यात येतील.  सांस्कृतिक कार्य विभाग हा या महोत्सवाचे समन्वयन करेल.  या विभागाच्या अधिपत्याखाली एकछत्र योजना तयार करण्यात येऊन विविध विभागांकडून प्रस्ताव मागवून त्यास मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील अंमलबजावणी समिती मंजुरी देईल, अशी माहिती देण्यात आली.