मुंबई : मुंबईतील तब्बल ७६२ पेक्षा अधिक खासगी रुग्णालये व नर्सिग होममध्ये अग्निप्रतिबंधात्मक उपाययोजना केलेल्या नसल्याचे आढळून आले आहे. भंडारा जिल्ह्य़ात शिशू केअर सेंटरमध्ये जानेवारीत लागलेल्या आगीनंतर मुंबईतील रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेबाबत तपासणी करण्यात आली होती. त्यात ही गंभीर बाब पुढे आली होती. अग्निसुरक्षा नसलेल्या २१९ खासगी नर्सिग होम आणि रुग्णालयांवर नोटीस बजावण्यात आली आहे. या रुग्णालयांना १२० दिवसांत अग्निसुरक्षेच्या अटींची पूर्तता करावी लागणार आहे.

भांडूप येथील ड्रीम्स मॉलमध्ये लागलेल्या आगीत करोना रुग्णालयही जळून खाक झाले. मॉलमध्ये रु ग्णालय असे दुर्मिळ उदाहरण या निमित्ताने पुढे आले आहे. मात्र या दुर्घटनेमुळे मॉलची अग्निसुरक्षा चर्चेत आली, तशीच रुग्णालयांमधील अग्निप्रतिबंधात्मक उपाययोजनाही ऐरणीवर आली आहे. भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर सेंटरमध्ये ९ जानेवारीला लागलेल्या आगीत दहा अर्भकांचा मृत्यू झाला होता.  त्यामुळे ११ जानेवारीनंतर पालिकेच्या अग्निशमन दलाकडून मुंबईतील एकूण १,१०९ खासगी नर्सिग होम व रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेची तपासणी करण्यात आली. यामध्ये ७१३ खासगी रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षाविषयक अटींची पूर्तता के ली नसल्याचे आढळून आले होते. तर पालिके च्या ४६ व सरकारी ३ रुग्णांमध्येही अशी यंत्रणा नसल्याचे आढळून आले होते.

रितसर अर्ज नाही

मुंबईतील ६१ रुग्णालये व नर्सिग होमसाठी रितसर अर्ज करून परवानगीच घेतलेली नाही. त्यांनाही आवश्यक तो अर्ज भरून परवानगी घेण्याबाबत विभाग कार्यालयांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सूचित करण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी दिली.