राज्यात गेल्या २४ तासात ७,८६३ नवे रुग्ण आढळले असून, ५४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.

राज्यात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून, ७९,०९३ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. पुणे जिल्ह्य़ात सर्वाधिक १५,८७२ रुग्ण उपचाराधीन आहेत. मुंबई ८२१७, ठाणे ८३६६, अमरावती ६४९१, नागपूर जिल्ह्य़ात ९,९२६ रुग्ण उपचाराधीन आहेत.

दिवसभरात पुणे शहर ७०३, पिंपरी-चिंचवड २८८, उर्वरित पुणे जिल्हा २३६, जालना १७७, औरंगाबाद १२८, अकोला जिल्हा ४०९, अमरावती शहर ४८३, उर्वरित अमरावती जिल्हा २९०, यवतमाळ १९७, बुलढाणा १८३, वाशिम १८४, नागपूर शहर ८०९, उर्वरित नागपूर जिल्हा २७९ नवे रुग्ण आढळले.

मुंबईत रुग्णसंख्येत किंचित घट

मुंबईतील रुग्णसंख्या गेल्या दोन दिवसांपासून काहीशी कमी झाली आहे. मंगळवारी ८४९ नव्या रुग्णांची नोंद झाली असून २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या नव्या रुग्णांपेक्षा जास्त आहे.

मुंबईत एकूण बाधितांची संख्या ३,२७,६१९ झाली आहे, तर एकूण ११,४७६ वर मृत्यू झाले आहेत. एका दिवसात ९०३ रुग्ण बरे झाले. त्यामुळे आतापर्यंत ३,०५,६३९ म्हणजेच ९३ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे मुंबईतील चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. आतापर्यंत ३३ लाख १० हजाराहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील रुग्णवाढीचा दर वाढून ०.२९ टक्के झाला असून रुग्ण दुपटीचा कालावधीही २४२ दिवसांपर्यंत खाली गेला आहे.

भिवंडीत लसीचा दुसरा डोस घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू

भिवंडी शहरात मंगळवारी सकाळी करोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर काही वेळाने चक्कर येऊन एका आरोग्य सेवकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र, त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून शवविच्छेदन अहवालानंतरच हे कारण स्पष्ट होऊ शकेल.

या घटनेत मृत्यू पावलेली ४० वर्षीय व्यक्ती ठाण्यातील मनोरमानगर परिसरामध्ये राहात होती. भिवंडीतील एका खासगी डॉक्टरकडे वाहनचालक म्हणून ते काम करीत होते. त्यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता भिवंडी शहरातील भाग्यनगरमधील केंद्रात करोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतला. त्यानंतर ते लसीकरण केंद्रातील प्रतीक्षागृहात थांबले होते. पंधरा मिनिटांनी चक्कर येऊन ते खाली पडले. त्यांना उपचारांसाठी भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या वृत्तास भिवंडी महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के आर. खरात यांनी दुजोरा दिला आहे.

को-विन पोर्टलवर ५० लाख जणांची नोंदणी

नवी दिल्ली : को-विन पोर्टल सोमवारी सकाळी सुरू झाल्यानंतर जवळपास ५० लाख जणांनी तेथे स्वनोंदणी केली आणि २.०८ लाख लाभार्थ्यांनी लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात कोविड-१९ लशीची पहिली मात्रा टोचून घेतली, असे केंद्र सरकारच्या वतीने मंगळवारी सांगण्यात आले.

देशात ६० वर्षांवरील नागरिक आणि ४५-६० वयोगटातील सहव्याधी असलेले नागरिक यांचे लसीकरण करण्याची मोहीम १ मार्चपासून सुरू करण्यात आली आणि को-विन पोर्टल नोंदणीसाठी सोमवारी सकाळी सुरू करण्यात आले. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, ६० वर्षांवरील आणि ४५-६० वर्षे वयोगटातील सहव्याधी असलेल्या जवळपास दोन लाख, आठ हजार, ७९१ जणांना लशीची पहिली मात्रा देण्यात आली.

* आतापर्यंत पहिल्या दोन टप्प्यात एक कोटी, ४८ लाख, ५५ हजार ०७३ जणांना मंगळवारी दुपारी एक वाजेपर्यंत कोविड-१९ लशीची मात्रा टोचण्यात आली.

* त्यामध्ये ६७ लाख, चार हजार, ८५६ आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी असून त्यांना लशीची पहिली मात्रा देण्यात आली.

* २५ लाख, ९८ हजार, १९२ आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लशाीची दुसरी मात्रा देण्यात आली, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले.

* त्याचप्रमाणे ५३ लाख, ४३ हजार २१९ करोनायोद्धय़ांना आतापर्यंत लशीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.