कंत्राटदार, विकासक, राजकारण्यांचा आशीर्वाद; नियमांची मोडतोड करून परवानग्यांचा सपाटा

राजकारणी, वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक, कंत्राटदार, विकासक यांच्या आशीर्वादामुळे तब्बल ७८७ अभियंते गेली अनेक वर्षे पालिकेतील एकाच विभागात ठिय्या मांडून बसले आहेत. या अभियंत्यांची बदली करण्याची हिम्मत प्रशासनात नसल्यामुळे त्यांचे फावत असून आपल्यावर कृपादृष्टी असलेल्या मंडळींचे हितसंबंध जपणाऱ्या या अभियंत्यांमुळे पालिका भ्रष्टाचाराचे आगार बनली आहे. काही विकासक आपल्या मर्जीतील व्यक्तीला पालिकेतील आवश्यक त्या विभाग कार्यालयात बदली करून घेत असल्याचेही उघड झाले आहे. तर मोठय़ा प्रमाणावर विकास सुरू असलेल्या विभाग कार्यालयांमध्ये हे अभियंते ठाण मांडून बसले आहेत.

पालिकेतील सर्वच विभागांमध्ये काम करणारे अधिकारी, अभियंते यांची दर तीन वर्षांनी बदली करण्याचा नियम आहे. मात्र हा नियम तब्बल ७८७ अभियंत्यांच्या बाबतीत मोडीत निघाला आहे. गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी हे अभियंते एकाच विभाग कार्यालयातील एकाच विभागात ठाण मांडून बसले आहेत. त्यामध्ये १८९ कनिष्ठ अभियंते, ४१९ दुय्यम अभियंते (स्थापत्य), ९३ साहाय्यक अभियंते (स्थापत्य) आणि ८६ साहाय्यक अभियंता (यांत्रिकी व विकास) यांचा समावेश आहे. कनिष्ठ अभियंत्यांपैकी १४७ जण पाच वर्षे एकाच विभागात, तर ४२ जण पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी एकाच विभागात आहेत. दुय्यम अभियंत्यांपैकी २० जण १० वर्षांपेक्षा अधिक, तर ३०० जण पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी आणि ९९ जण पाच वर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसले आहेत. साहाय्यक अभियंत्यांपैकी २८ जण पाच वर्षे एकाच विभागात, तर ६५ जण पाच वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच विभागात कार्यरत आहेत. तसेच साहाय्यक अभियंत्यांपैकी ६२ जण पाच वर्षांपेक्षा अधिक, तर २३ जण १० वर्षांपेक्षा अधिक काळ एक ठिय्या मांडून बसले आहेत. माहितीचा अधिकार कार्यकर्ते महेश शिरवटकर यांनी पालिकेकडे ‘माहितीचा अधिकार’ कायद्यांतर्गत अर्ज करून तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी एकाच पदावर कार्यरत असलेल्या अभियंत्यांची माहिती मागविली होती. पालिका प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरून ७८७ अभियंते तीन वर्षांहून अधिक काळ एकाच विभागात कार्यरत असल्याचे उघडकीस आले आहे.

विकासक, व्यावसायिक, कंत्राटदार, राजकारणी मंडळी पालिकेशी संबंधित आपली कामे या अभियंत्यांमार्फत करवून घेत असतात. त्या बदल्यात या अभियंत्यांच्या पदरात बिदागी पडत असते. या अभियंत्यांची बदली होऊ नये याची विकासक, व्यावसायिक, राजकारणी, कंत्राटदार काळजी घेत असतात. वेळप्रसंगी आपली मर्जी असलेल्या अभियंत्यांवर खप्पामर्जी झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचीच बदली करण्याच्या अनेक घटना पालिकेमध्ये घडल्या आहेत. त्यामुळे या अभियंत्याच्या वाटेला सहसा वरिष्ठ अधिकारी जाण्यास धजावत नाहीत, असे आढळून आले आहेत. त्यामुळे या मंडळींचा पालिकेमध्ये मनमानी कारभार सुरू आहे. यापैकी बहुतांश अभियंते नियमांची मोडतोड करून संबंधितांना विविध कामांसाठी पालिकेकडून परवानगी कशी मिळू शकेल यात गुंतलेले असतात. त्याचा अनुभव २९ डिसेंबर रोजी परळ येथील कमला मिल येथील अग्नितांडवानंतर आला. मात्र तरीही या शुक्राचार्याना हात लावण्याची हिंमत प्रशासनाला झालेली नाही.

राजकारणी, व्यावसायिक, कंत्राटदार, विकासक यांची मर्जी संपादन करून त्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी हे अभियंते गेली अनेक वर्षे एकाच विभागात कार्यरत आहेत. याबाबत पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, नगर अभियंता यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आलेली आहे. मात्र या तक्रारीची दखलच घेतलेली नाही. त्यामुळे या अभियंत्यांचे फावत आहे.

– महेश शिरवटकर, माहितीचा अधिकार कार्यकर्ते